जळगाव

Jalgaon crime | 'ड्रॉप केस'च्या नावाखाली सुरू होता काळा बाजार? मुक्ताईनगरमधील ५ गावांवर पोलिसांचा छापा

मागील तीन वर्षांत या परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पोलिसांनी 'ड्रॉप केस' प्रकारातील गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जॉधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये शुक्रवारी पहाटे मोठी संयुक्त कारवाई राबवली. "ऑपरेशन ड्रॉप केस" नावाने राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, शस्त्रे, वाहने आणि वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमुळे चर्चेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिया, सुलेमानी पत्थर, जुने सोने, कॉपर, शंख तसेच अन्य कथित दुर्मिळ वस्तूंच्या नावाखाली मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून लोकांना बोलावले जात होते.

गावात आल्यानंतर संबंधितांना बनावट वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. विरोध करणाऱ्यांना मारहाण, लूटमार तसेच धमकावण्याचे प्रकारही घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. काही प्रकरणांमध्ये वन्यजीवांचे कातडे जवळ ठेवून व्हिडिओ चित्रीत करून पीडितांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी दिली जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या भाषेत या प्रकाराला "ड्रॉप केस" म्हणून ओळखले जाते.

मागील तीन वर्षांत या परिसरात दरोडा, खुनासह दरोडा, खून, जबरी चोरी, फसवणूक, दरोड्याचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना अटक केली. तसेच २० लाख रुपयांची रोकड, सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८ लाख रुपये किंमतीचे चार किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरण, कोल्हा आणि सशाचे कातडे, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मोहिमेत १९ रोजी कोम्बिग ऑपरेशन दरोडाग्रस्त हलखेडा, लालगोटा व मधापुरी या गावात रावबविण्यात आले. कोम्बिंग ऑपरेशन करिता उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ, चार्ज मुक्ताईनगर केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर,स्था.गु.शा. पो. नि. राहुल गायकवाड भुसावळ तालुका, पो. नि. महेश गायकवाड , पो. नि. निलेश गायकवाड भुसावळ तालुका पोलीस ठाणे, पो. नि. राहुल वाघ पो. नि. आशिष लव्हांगळे बोदवड पोलीस ठाणे, स.पो.नि. विशाल पाटील सावदा पोलीस ठाणे, स.पो. नि. योगिता नारखेडे नशिराबाद पोलीस ठाणे, स.पो. नि. मीरा देशमुख निभोरा पोलीस ठाणे, स.पो. नि. अमित कुमार बागुल वरणगाव पोलीस ठाणे व 200 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT