

नांदेड : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे.
विष्णुपरी येथील शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करताना पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. लखन शिवाजी हातागळे (वय 21, रा. नवीन आबादी, मुदखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णुपरी येथील सरकारी दवाखान्याच्या पार्किंगमधून शिवाजी राजाराम निलपत्रेवार (रा. धनेगाव) यांची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोलकर आणि उपनिरीक्षक व्यंकट कुसमे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली.
त्या आधारे पोलिसांनी संशयित लखन हातागळे याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने विष्णुपरी येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने कामठा, लहान लोण (ता. अर्धापूर), सोनपेठ (जि. परभणी) आणि जवळा बाजार (जि. हिंगोली) येथूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या घरातून पोलिसांना हिरो होंडा स्पलेंडर आणि सीडी डिलक्स अशा एकूण 5 दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदर कामगिरी पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, अंमलदार वसंत केंद्रे, मारोती पचलिंग, सचिन चावरे, समीर अहमद, धम्मपाल कांबळे, शंकर माळगे, सुरेश नागरगोजे आणि शिवानंद तेजबंद यांनी केली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.