

नांदेड ः नांदेड जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मुखेड तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिप्परगा (दे) येथील एका शेतावर छापा टाकून पोलिसांनी चक्क गांजाची लागवड करणाऱ्या एका 67 वर्षीय वृद्धाला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 5 किलो 190 ग्रॅम वजनाचा, तब्बल 1,03,800 रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त करण्यात आला आहे. गोविंद केरबा शिकारे (67 वर्षे, रा. हिप्परगा (दे), ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना, दि. 22 मे रोजी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे व त्यांच्या पथकाला एक अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. हिप्परगा (दे) शिवारातील गोविंद शिकारे याने स्वतःच्या शेतात एन.डी.पी.एस. ॲक्टच्या तरतुदींचा भंग करून, चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाची झाडे लावल्याचे खबऱ्याने दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता. वरिष्ठांच्या परवानगीने राजपत्रीत अधिकारी, शासकीय पंच आणि पोलिसांच्या फौजफाट्यासह हिप्परगा शिवारातील संबंधित शेतावर छापा टाकण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, देगलूरचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोउपनि बळीराम दासरे , पोउपनि माधव केंद्रे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिलीपकुमार चंचलवार, देविदास चव्हाण, रितेश कुलथे, मोतीराम पवार आणि चालक सुधाकर देवकत्ते यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने शेती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाईत काय आढळले?
पोलिसांनी शेताची कसून पाहणी केली असता, तिथे हिरवी पाने आणि बोंडे असलेले अंमली पदार्थ गांजाचे एक मोठे झाड आढळून आले. पोलिसांनी हे झाड जप्त करून त्याचे वजन केले असता ते 5 किलो 190 ग्रॅम भरले. बाजारात याची किंमत 1 लाख 3 हजार 800 रुपये आहे.
गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात
पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपी गोविंद शिकारे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.