प्रातिनिधीक फोटो  (File Photo)
जळगाव

Jalgaon Bribe | सावकारी परवाना मंजुरीसाठी ३० हजारांची लाच घेतली ; सहकार अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध 'एसीबी'ची कारवाई

सहकार विभागातील एका अधिकाऱ्यासह दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून गुन्हा दाखल केला

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Cooperative Officer Bribery Case

जळगाव : सावकारी व्यवसायाचा परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी सहकार विभागातील एका अधिकाऱ्यासह दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये विजय विनायकराव गरूड (सहकार अधिकारी, वर्ग-३), सुरेश जनार्दन विसपुते (प्रमाणित लेखापरीक्षक, भुसावळ) आणि हेमंत प्रकाश काळे (प्रमाणित लेखापरीक्षक, जळगाव) यांचा समावेश आहे. तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७, ७-अ आणि १२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून सावकारी व्यवसायाचा परवाना मिळविण्यासाठी त्यांनी ३० मार्च रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज केला होता. परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय गरूड यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याचबरोबर त्यांनी तक्रारदारांना प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश विसपुते यांची भेट घेण्यास सांगितले होते.

याप्रकरणी तक्रारदारांनी २३ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान सुरेश विसपुते यांनी विजय गरूड, स्वतः आणि हेमंत काळे यांच्यासाठी मिळून ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार १५ जून रोजी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात एसीबीने सापळा रचला. कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदारांचे हेमंत काळे यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करून दिले. त्यावेळी हेमंत काळे यांनी लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

यानंतर सुरेश विसपुते यांनी पंचांसमक्ष तक्रारदारांकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. तसेच या रकमेपैकी ५ हजार रुपये विजय गरूड यांच्या सांगण्यावरून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पाठविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील तसेच पोलीस हवालदार किशोर महाजन, प्रणेश ठाकूर आणि बाळू मराठे यांचा समावेश होता. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT