Jalgaon Water Scarcity : 'जलसंपदामंत्र्यांच्या'च मतदारसंघात पाण्यासाठी वणवण! पहूर पेठ कसबेची पाणीटंचाई चाळीस वर्षांपासून कायम

वाघूर नदीपात्रातील झिऱ्यांच्या भरवशावर गावाची तहान
Water Scarcity
पाणीटंचाईFile Photo
Published on
Updated on

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याच विधानसभा मतदारसंघातील पहूर पेठ कसबे येथे गेल्या चाळीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून आजही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वाघूर नदीच्या काठावर वसलेले गाव असूनही महिलांना नदीपात्रात झिरे तयार करून त्यातून झिरपणारे पाणी भरावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पहूर पेठ व पहूर पेठ कसबे या गावांसाठी संयुक्त जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प केवळ नावापुरताच असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असले तरी जलकुंभाचे काम अद्याप अपूर्ण असून नागरिकांच्या घरांपर्यंत नळजोडण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची योजना पूर्णत्वास येण्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे.

सध्या गावाला देऊळ गुगळी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरणातील पाणीसाठा संपल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. धरण जवळपास कोरडे पडले असून तेथे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. धरणात पाणी असताना अनेक ठिकाणी कूपनलिका व पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान, वाघूर नदीपात्रात ग्रामस्थांनी झिरे तयार केले असून त्यात जमा होणारे पाणी कॅन, हंडे व घागरींमध्ये भरून नेले जाते. भर उन्हात महिला व लहान मुले नदीपात्रात तासंतास पाण्याची वाट पाहताना दिसतात. विशेष म्हणजे ज्या नदीपात्र परिसरात नागरिकांना शौचास जावे लागते, त्याच ठिकाणचे पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत वाघूर प्रकल्पावर आधारित सुमारे 34 कोटी 15 लाख रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. मात्र, या योजनेतील पाईपलाईनचे सुमारे 81 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचण्याचे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे.

"जेवण करून जा, पण पाणी मागू नका"

ग्रामस्थ सुभद्रा रामदास बारी यांनी सांगितले की, "गावात महिनाभरानंतर पाणी येते. ग्रामपंचायतीचा टँकर येतो, पण तेथेही पाणी भरण्यावरून भांडणे होतात. पिण्यासाठी 20 ते 30 रुपये देऊन पाण्याचा जार विकत घ्यावा लागतो. काम मिळाले नाही तर तोही घेणे शक्य होत नाही. आम्ही एकट्या महिला पोट भरू की पाणी विकत घेऊ, असा प्रश्न निर्माण झाला आहे."

"जलजीवन मिशनचे काम सुरू"

सरपंच तडवी अफजल इस्माईल यांनी सांगितले की, "कमी पाऊस झाल्यामुळे आणि पाणीसाठा घटल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. वाघूर प्रकल्पातून जलजीवन मिशनचे काम सुरू असून नागरिकांना लवकरच नियमित पाणीपुरवठा मिळेल. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे."

"पाणीपुरवठा पूर्णपणे बंद नाही"

उपसरपंच राजू जाधव यांनी सांगितले की, "धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. मात्र पाणीपुरवठा पूर्णपणे बंद नाही. 12 ते 14 दिवसांच्या अंतराने गावात पाणी दिले जात आहे. 34 कोटी रुपयांच्या योजनेचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून काही भागात पुरवठाही सुरू करण्यात आला आहे. उर्वरित भागात एक-दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल."

चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या या पाणीटंचाईमुळे पहूर पेठ कसबेतील नागरिक त्रस्त झाले असून जलजीवन मिशनची कोट्यवधी रुपयांची योजना प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news