जळगाव

Chemist Protest Jalgaon| बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसीविरोधात औषध विक्रेते आक्रमक; पुकारला 'काळा' एल्गार

प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड; ट्रॅफिक पोलीस गायब, मोर्चेकऱ्यांनीच हाती घेतली वाहतुकीची सूत्रे; स्वातंत्र्य चौकात प्रचंड वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : केंद्र व राज्यामध्ये सर्रास सुरू असलेल्या बेकायदेशीर ई-फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावातील हजारो औषध विक्रेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, एकीकडे हा मोर्चा यशस्वी ठरला असला, तरी दुसरीकडे जळगाव शहर वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि बेफिकिरीमुळे मुख्य चौकांमध्ये वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा पाहायला मिळाला.

महिलांचे काळे कपडे, पुरुषांच्या डोक्यावर काळ्या टोपीचा 'आक्रोश'

आज सकाळी ठीक ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील हजारो मेडिकल व्यावसायिक, महिला व पुरुष अत्यंत शिस्तीत पण प्रचंड संतापाने सहभागी झाले होते. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी महिला औषध विक्रेत्यांनी काळे कपडे परिधान केले होते, तर पुरुष विक्रेत्यांच्या डोक्यावर काळ्या टोप्या होत्या. 'ऑनलाईन औषध विक्री बंद झालीच पाहिजे', 'औषध विक्रेत्यांच्या मागण्या मान्य करा' अशा गगनभेदी घोषणा देत हा मोर्चा दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्चा निघणार याची पूर्वकल्पना असूनही जळगाव शहर वाहतूक पोलीस नसल्याने मोर्चाच्या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी , मोर्चेकऱ्यांनीच स्वतः ट्रॅफिक पोलिसांची भूमिका बजावत ज्याला जमेल तशी वाहतूक वळवण्यास सुरुवात केली. खरा गोंधळ उडाला तो मध्यवर्ती असलेल्या 'स्वातंत्र्य चौकात'. मोर्चा या चौकात आला तेव्हा येथील ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली नव्हती. मोर्चा आणि अस्ताव्यस्त वाहने समोरासमोर आली. चारही बाजूंनी येणारी वाहने एकाच वेळी कोंडली गेल्याने वाहतूक काही काळा ठप्प झाली. मोर्चा पुढे निघून गेल्यानंतरही विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आणताना वाहनधारकांना आणि नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मोर्चेकरी आपल्या पद्धतीने वाहने वळवत असल्याने अपघाताची भीतीही निर्माण झाली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने खालील मुद्दे मांडण्यात आले आहेत:

१. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालावी.

२. ई-पोर्टल आणि जाचक 'GSR 817 (E)' (दि. २८.०८.२०१८) तसेच कोविड काळातील 'GSR 220 (E)' (दि. २६.०३.२०२०) हे नियम तात्काळ मागे घेण्यात यावेत.

३. वारंवार केंद्रीय मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटूनही केवळ नकारात्मक भूमिका घेणाऱ्या शासनाचा निषेध करण्यात आला.

या निवेदनासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राची प्रतही जोडण्यात आली असून, जळगावच्या औषध विक्रेत्यांच्या तीव्र भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. औषध विक्रेत्यांच्या या बंदमुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेने संवेदनशीलता दाखवली आहे. बंदच्या काळात जळगाव जिल्ह्यात कुठेही अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास किंवा तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास संघटनेचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील डीलर असोसिएशनचे पदाधिकारी, किरकोळ व घाऊक औषध विक्रेते आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT