जळगाव

Jalgaon crime : भुसावळ रेल्वे स्थानकावर १२ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने ठोकल्या बेड्या

पुरी-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये ‘सीआयबी’ची मोठी कारवाई; तब्बल २५ किलो गांजासह ट्रॉली बॅगा जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात राबवल्या जात असलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल आणि गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पुरी-गांधीधाम एक्सप्रेसमधून ट्रॉली बॅगांमध्ये चोरट्या मार्गाने नेला जाणारा तब्बल १२ लाख ५८ हजार ३५० रुपये किमतीचा २५.१६७ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मध्य प्रदेशातील दोन महिलांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

अवैध तस्करी करणाऱ्यांनी रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांचे रूप घेऊन प्रवास करत असल्याचे दाखवले. प्रवास करण्यात उपयोगात येणाऱ्या ट्रॉली बॅगेचा वापर करण्यात आला. या अवैध पदार्थ तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने भुसावळ स्थानकावरून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (२३ ऑगस्ट) गाडी क्रमांक २२९७४ अप पुरी-गांधीधाम एक्सप्रेसच्या 'B/3' कोचमधून दोन संशयित महिला प्रवास करत होत्या. सीआयबी (CIB) पथकाचे उपनिरीक्षक सुनील कोळी, सुशील धर्मे, सोनल इंगळे आणि महिला सहाय्यक उपनिरीक्षक (LASI) अकोला यांनी गस्तीदरम्यान संशयावरून त्यांची पाहणी केली. गाडी भुसावळ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येताच सहाय्यक उपनिरीक्षक दीपक तायडे यांनी पथकासह दोन्ही महिलांना ट्रॉली बॅगांसह ताब्यात घेतले.

सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणि डॉग स्क्वॉडच्या 'वीरू' नावाच्या श्वानाच्या साहाय्याने तपासणी केली असता, ट्रॉली बॅगांमध्ये अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सहाय्यक सुरक्षा आयुक्त जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत पंचनामा करून बॅगांची झडती घेण्यात आली. बॅगांमध्ये गांजाचे ६ मोठे बंडल मिळून आले, ज्याचे वजन २५.१६७ किलो भरले. सीमा करेलाल (वय २४, रा. सोहागपूर, जि. होशंगाबाद, म.प्र.), ज्योती देवीसिंग मालवीय (वय २६, रा. काळी मंदिर जवळ, जि. होशंगाबाद, म.प्र.) यांना अटक झाली.

जप्त केलेला १२.५८ लाखांचा गांजा आणि दोन्ही आरोपी महिलांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) हवाली करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट रोजी पहाटे ५:१५ वाजता जीआरपी पोलिसांनी ACR क्र. ६३४/२०२६ अन्वये एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) कलम ८, २०(ब) व बीएनएस कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जे. ए. शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT