Jalgaon Waghur Bridge Issue pudhari
जळगाव

Jalgaon Waghur Bridge Issue: वाघूर नदी अन् रेल्वे पुलावरील जॉईंटची दुरावस्था... डांबरांचे थर देऊन केलेला 'जुगाड'मुळे अपघातांना आमंत्रण

Anirudha Sankpal

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव आणि भुसावळ शहरांना जोडणारा मुख्य मार्ग असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाघूर नदीचा पूल आणि पुढील रेल्वे पुलाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. पुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहनांच्या सुकर प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले 'एक्सपान्शन जॉईंट' (प्रसरण सांधे) पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी थेट पुलाच्या लोखंडी पट्ट्यांना वेल्डिंग करण्याचा आणि खराब रबराच्या जागी डांबराचे थर देण्याचा अजब 'जुगाड' केला आहे. या अयोग्य दुरुस्तीमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली असून, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांकडे याकडे लक्ष देण्यास वेळ नाही का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणामध्ये वाघूर नदीवर नवीन पूल उभारण्यात आला. जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या पुलाच्या भागामध्ये सध्या अनेक ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. वाहनांच्या वजनामुळे पुलाचे जे कंपन होते, ते सोसण्यासाठी दोन स्लॅबच्या मध्ये लोखंडी पट्ट्या आणि रबराचे इक्सपॅन्शन जॉईंट्स दिले जातात. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या पट्ट्या आणि रबर पूर्णपणे खराब झाले आहेत. हे सांधे निखळल्यामुळे होणारे कंपन आणि आवाज दाबण्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क दोन पुलांना जोडणाऱ्या लोखंडी पट्ट्यांना थेट वेल्डिंग करून टाकले आहे. तर काही ठिकाणी रबर खराब झालेल्या भागात नुसतेच डांबरीकरण करून वेळ मारून नेण्यात आली आहे.

पुलाच्या अस्तित्वालाच धोका!

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काँक्रीटच्या प्रसरण आणि आकुंचन पावण्याच्या प्रक्रियेला जागा मिळावी म्हणून हे जॉईंट्स दिलेले असतात. मात्र, त्यांना थेट वेल्डिंग केल्यामुळे किंवा डांबराने बुजवल्यामुळे पुलाच्या नैसर्गिक हालचालीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे पुलाच्या मूळ संरचनेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वाघूर नदीपुलाप्रमाणेच पुढे असणाऱ्या रेल्वे पुलावरील जॉईंट्सचीही अशीच दुरवस्था झाली असून, तिथेही अशीच तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.

महामार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने अत्यंत वेगाने धावत असतात. या पुलांवरून गाडी जाताना आता भीषण हादरे बसत आहेत. मात्र, 'न्हाई'चे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अभियंते या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. तात्पुरती दुरुस्ती करून कंत्राटदार आणि अधिकारी आपली कातडी वाचवत असले, तरी प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा तीव्र संताप जळगाव-भुसावळकर प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

नदीच्या किंवा इतर कुठल्याही मोठ्या पुलावर टाकलेल्या स्लॅबमध्ये जो जॉईंट ठेवलेला असतो, त्याला तांत्रिक भाषेत 'एक्सपान्शन जॉईंट' किंवा 'काँट्रॅक्शन जॉईंट' म्हणतात.

हवामानातील बदलांमुळे (उन्हाळ्यात उष्णतेने आणि हिवाळ्यात थंडीने) पुलाचे काँक्रीट आणि लोखंड प्रसरण पावते किंवा आकुंचन पावते. जर हा सांधा ठेवला नाही, तर पुलाला मोठे तडे जाऊ शकतात किंवा पूल कमकुवत होऊ शकतो.

गाड्या चालवताना येणारा आवाज: आपण जेव्हा पुलावरून गाडी चालवतो, तेव्हा ठराविक अंतरावर 'खडक-खडक' असा जो आवाज येतो, तो याच इक्सपॅन्शन जॉईंट्सवरून चाके गेल्यामुळे येतो.

दोन स्लॅबमधील ही मोकळी जागा भरण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यावर स्टीलच्या पट्ट्या किंवा रबरी साहित्याचा थर बसवलेला असतो, जेणेकरून पुलाची हालचाल सुरक्षितपणे होऊ शकते.

याबाबत न्हाई चे अभियंता अंकित दुबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही रस्त्याच्या यामधील इक्सपॅन्शन जॉईंट' काम सुरू झालेले आहेत लवकरच वाघुर पुलाचे ही काम सुरू होईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT