

जळगाव: एरंडोल तालुक्यातील वनकोठे शिवारातील बंद पडलेला 'वसंत सहकारी साखर कारखाना' जळगाव जिल्हा बँकेने विक्रीला काढल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. "आमच्या सोन्याच्या भावाच्या जमिनी कवडीमोल दरात लाटून आता कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटण्याचं कारस्थान जिल्हा बँक रचत आहे," असा थेट आणि गंभीर आरोप वनकोठे येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांनी केला आहे.
या फसवणुकीविरोधात भारत अशोक चौधरी, मोहनीश विलास पाटील यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाकडे धाव घेत आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा आणि थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
विकासाच्या भूलथापा आणि २५ वर्षांचा वनवास
१९७६ मध्ये मोठ्या आशेने सुरू झालेला हा वसंत साखर कारखाना १९९८ पर्यंत सुरळीत सुरू होता. त्यानंतर केवळ वर्षभर 'गंगामाई इंडस्ट्रीज'ने हा कारखाना चालवला. मात्र, दुर्दैवाने गेल्या २८ वर्षांपासून हा कारखाना कुलूपबंद अवस्थेत धूळ खात पडला आहे.
ज्यावेळी कारखाना उभारणीची घोषणा झाली, तेव्हा "परिसराचा कायापालट होईल, स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल," अशा गोड भूलथापा नेत्यांनी आणि प्रशासनाने मारल्या होत्या. या आमिषाला बळी पडून शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या सुपीक जमिनी अत्यंत स्वस्त दरात कारखान्यासाठी दिल्या. मात्र, आज रोजगारही गेला, कारखानाही बुडाला आणि आता हक्काची जमीनही लिलावात निघाल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
जिल्हा बँकेचे 'ते' कारस्थान आणि शेतकऱ्यांचा आक्रोश
आता याच शेतजमिनीवर उभा असलेला कारखाना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीपोटी विक्रीला काढला आहे. या लिलावातून बँक आपला कोट्यवधींचा नफा कमावण्याच्या तयारीत आहे. यावरून आमची उघड फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. "आमच्या हक्काच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन आज त्याची कोट्यवधी रुपयांना विक्री करणे हा आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
...तर होणाऱ्या बऱ्या-वाईटाला सरकार आणि बँक जबाबदार!
"आम्ही हक्काने दिलेल्या जमिनी आम्हाला तात्काळ परत मिळाव्यात, ही आमची नम्र विनंती आहे. जर प्रशासनाने आणि सरकारने आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन छेडू. या आंदोलनादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि जळगाव जिल्हा बँकेची राहील," असा थेट आणि आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या शेतकऱ्यांनी फुंकले आंदोलनाचे रणशिंग:
या आंदोलनात भारत अशोक चौधरी, मोहनीश विलास पाटील, समाधान शांताराम चौधरी, गजानन अरुण चौधरी, मुकेश दयाराम चौधरी, अनिल पाटील, एकनाथ रतन चौधरी, दौलत हिलाल पाटील, रामराम बळीराम पाटील, विक्रम सिताराम पाटील, पप्पू पाटील, योगेश लोटन चौधरी, दिपचंद झंगा चौधरी, मंगा भिका सोनवणे, वैभव पाटील, पंढरीनाथ पाटील, गुलाब भगवान पाटील यांच्यासह वनकोठे शिवारातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा बँक आता यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.