Murder Case Pudhari
जळगाव

Jalgaon crime: भुसावळ रेल्वे यार्डातील गोडाऊनमध्ये २३ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

उज्जैनला जाणारा मुलगा भुसावळला कसा पोहोचला?; असा प्रश्न उपस्थित होत आहे

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : उज्जैनला जात असल्याचे सांगून घरातून निघालेला वर्धा जिल्ह्यातील २३ वर्षीय युवक भुसावळ येथील रेल्वे यार्ड परिसरात कसा पोहोचला? त्याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भुसावळ रेल्वे यार्ड पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या गोडाऊनच्या खोलीत १६ ऑगस्ट रोजी एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

मृतदेहाची स्थिती अत्यंत खराब झाली होती. शरीराचा खालचा भाग कुजल्याने खाली पडलेला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मृतदेहाची झडती घेतली असता पॅन्टच्या खिशात एक पाकीट मिळाले. त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो आढळून आले.

आधारकार्डवरील माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव योगेश विजय वाघधरे (वय २३), रा. ठाणेगाव, ता. कारंजा, जि. वर्धा असे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारंजा पोलिसांशी संपर्क साधला असता योगेश याच्याबाबत आधीच बेपत्ता व्यक्तीची नोंद असल्याचे स्पष्ट झाले.

योगेशचे वडील विजय रामचंद्र वाघधरे यांनी १८ जुलै २०२६ रोजी कारंजा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ३०/२०२६ नुसार तक्रार दिली होती. योगेश हा १२ जुलै रोजी उज्जैनला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता, अशी माहिती या मिसिंग तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतदेह सापडल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृताची ओळख पटविण्यासाठी तसेच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. योगेशच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून, ओळख पटविण्यासह पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरित

उज्जैनला जाण्याचे सांगून वर्धा जिल्ह्यातील घरातून निघालेला योगेश थेट भुसावळ रेल्वे यार्डातील गोडाऊनपर्यंत कसा पोहोचला? तो भुसावळमध्ये कोणाला भेटला होता का? त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? या घटनेमागे घातपात आहे की अन्य कारण, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, तेथील परिस्थिती, रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, योगेशच्या प्रवासाचा मार्ग आणि त्याच्या जवळ मोबाईल फोन होता की नाही होता तर त्या मोबाईल ची माहिती तपासल्यानंतरच या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘उज्जैनला जाणारा योगेश भुसावळच्या रेल्वे यार्डात कसा पोहोचला?’ हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT