

जळगाव : दीपनगर पॉवर प्लांट आणि रेल्वेच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या भंगार आणि कोळसा चोरांवर आज भुसावळात धडक कारवाई पाहायला मिळाली. भुसावळ शहर व परिसर गुन्हेगारमुक्त करण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविले. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत राबवलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन पार पडले. या मोहिमेत ९ पोलीस अधिकारी, ३० अंमलदार, आरसीपीच्या ३ प्लाटूनसह RPF चे ११ अधिकारी व ५३ कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा सहभागी झाला होता. या संयुक्त पथकाने थेट ६० सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेत २५ संशयितांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान एन्झेल नगर परिसरातून बाजारपेठ पोलिसांच्या रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी शौकीब शहा शरीफ शहा याला देशी कट्ट्यासह (आर्म्स ॲक्ट ३/२५) बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच रेल्वे पोलिसांच्या ३ बिगरजामीनपात्र वॉरंटमधील सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाठ (उर्फ श्याम काळ्या) याच्या मुसक्या आवळून त्याला आरपीएफच्या स्वाधीन करण्यात आले. दुसऱ्या एका कारवाईत, निंभोरा येथील आरोपी राजू मुरकाडे याच्याकडून ५० किलो चोरीची केबल आणि केबल कापण्याचे साहित्य जप्त करून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आणला गेला.
या मोहिमेत रेल्वे व दीपनगर भागातील भंगार आणि कोळसा चोरीतील संशयितांपैकी ६० रेकॉर्डवरील सराईत आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय परिसरातील भंगार दुकाने व गोदामांचीही कडक तपासणी करण्यात आली. सर्व गुन्हेगारांचा अद्ययावत डिजिटल डेटा तयार करून पोलीस व आरपीएफने माहितीचे आदान-प्रदान केले आहे. "रेल्वे व शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, अशा कारवाया पुढेही सुरूच राहतील," असा कडक इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.