Bhawarlal Jain Pudhari
जळगाव

Bhavarlal Jain Death Anniversary: ‘मोठेभाऊ’ भवरलालजी जैन: सारथी अबुबकर खान यांच्या स्मरणातील जिवंत व्यक्तिमत्त्व

33 वर्षांच्या सहवासातील शिस्त, माणुसकी आणि दूरदृष्टीच्या हृदयस्पर्शी आठवणी

पुढारी वृत्तसेवा

शब्दांकन - किशोर कुळकर्णी

एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास लोकांना मंचावर दिसतो, पण त्या प्रवासामागे शांतपणे, सावलीसारखा साथ देणारा माणूस क्वचितच प्रकाशझोतात येतो. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक दौऱ्यावर आणि प्रत्येक धावपळीत सोबत राहिलेले त्यांचे विश्वासू वाहन चालक अबुबकर खान हे असेच एक निष्ठावान वाहन चालक (सारथी) होय. ज्यांच्या हृदयात श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या अनमोल आठवणी आहेत. त्यांनी केवळ गाडी चालवली नाही, तर भाऊंच्या स्वभावाचा, शिस्तीचा आणि माणुसकीचा जवळून साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. स्टेअरिंगच्या पलीकडे असलेल्या त्यांच्या आठवणींमधून भाऊंचे व्यक्तिमत्त्व अधिक जिवंत, अधिक मानवी रूपात आपल्या समोर उभे राहील हे तितकेच खरे.

श्रद्धेय मोठेभाऊ आज शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा ठेवा आजही माझ्या मनात ताजा आहे. त्यांनी मला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे, आत्मसन्मान आणि शिक्षणाची उघडी असलेली दारे. मी फारसा शिकलेलो नसलो, तरी भाऊंच्या विचारांचे 'फॉलो-अप' मी आजही माझ्या आयुष्यात घेत आहे. भाऊंच्या त्या आठवणी, हेच माझ्या आयुष्याचे खरे भांडवल आहे असे अबुबकार खान मानतात…

कॉर्पोरेट जगतात 'मल्टिटास्किंग' आणि 'व्हिजनरी' हे शब्द आपण अनेकदा ऐकायला मिळतात. एक काम सुरू असताना आपल्या क्वचितच दुसरे काम करता येते परंतु श्रद्धेय मोठेभाऊ (आदरणीय भवरलालजी जैन) एकाच वेळी तीन तीन काम मोठ्या खुबीने करताना मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या रुपाने असे जगलेली एक महनीय व्यक्ती मी जवळून पाहिली आहे. एकाच वेळा अनेक कामांवर फोकस करणारे मोठेभाऊ हे करायचे तरी कसे? हा गुढ प्रश्न आजही मला पडतो. ३३ वर्षांनंतर मागे वळून पाहताना जाणवते की, मी केवळ त्यांची गाडी चालवत नव्हतो, तर मी आयुष्याचं एक चालतं-बोलतं विद्यापीठ अनुभवत होतो.

भाऊंच्या गाडीत बसले की एखादं कॉर्पोरेट ऑफिसच सुरू व्हायचं. गाडी धावत असायची आणि भाऊ एकाच वेळी तीन तीन आघाड्यांवर लढत असायचे. गाडीत हॅण्ड फ्री फोनवर मुंबई स्थित कंपनीचे वरिष्ठ आर. बी. देशमुख साहेबांशी 'कॅश फ्लो' आणि कच्च्या मालाच्या आर्थिक नियोजनावर चर्चा चालायची, तर दुसऱ्या बाजूला सिव्हिल इंजिनिअर्सना हातातील 'ड्रॉइंग' बघून काही तांत्रिक सूचना दिल्या जायच्या. त्याच वेळी डायरीत किती रोपांची निर्मिती झाली, त्यात टिश्युकल्चर केळी रोपे किती, डाळींबाची किती, रोपांची निर्मिती, प्रायोरिटीची कामे, ग्रीनहाऊस शेड हाऊस या एक नव्हे तर अनेक विषयांची जंत्री त्यांच्या सोबत असलेल्या डायरीत स्वतःच नोंदी करत असत. मध्येच देशमुख साहेब, गाडीत ड्रॉईंग दाखविणारे सिव्हील इंजिनियर्स त्यात भरीसभर टिश्युकल्चरचे विजयसिंग पाटलांना विचारलं जायचं, "विजयसिंग, टाकाखेड्याच्या टिश्युकल्चरची काय प्रगती आहे?"

हे सगळं पाहून मी अवाक व्हायचो. एकाच मेंदूमध्ये इतके विभाग, इतक्या नोंदी आणि इतकी स्पष्टता कशी असू शकते? श्रद्धेय मोठेभाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने एक 'संस्था' होते.भाऊंनी मला केवळ रस्ते दाखवले नाहीत, तर माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील दिलेला आहे. एकदा एका स्वच्छता कर्मचाऱ्याला गाडीत घेताना मी कचरलो, तेव्हा भाऊंनी मला जे सांगितले ते आजही काळजात कोरलेले आहे. ते म्हणाले होते: "खान, आपण जगातील सगळ्यांचे अश्रू पुसू शकत नाही, पण जो आपल्या समोर आला आहे, त्याचे दुःख दूर करणे हेच आपले कर्तव्य आहे." त्या सहकाऱ्याला गाडीत सन्मानाने बसवून, त्याच्या घराची आस्थेवाईक चौकशी करून त्याच्या काळजात भाऊंनी कायमची जागा केली. या प्रसंगातून भाऊंनी मला शिकवलं की, पदापेक्षा 'माणूस' मोठा असतो. तो माणूस गाडीतून उतरताना चार्ज होऊन उतरला, जणू त्याला आयुष्याचं नवं बळ मिळालं होतं.

भाऊ नेहमी म्हणायचे, "खान, तू फारसा शिकलेला नाहीस पण तुझ्या पुढच्या पिढीचा रस्ता तू मोकळा केला पाहिजे." आज माझी एक मुलगी फिजियोथेरपिस्ट (BPT) आहे, दुसरी आर्किटेक्ट आहे आणि मुलगाही डॉक्टर झाला फिजियोथेरपिस्ट (BPT) आहे. २० वर्षांपूर्वी जेव्हा 'फिजियोथेरपी' हा शब्दही आम्हाला नीट माहित नव्हता, तेव्हा भाऊंनी माझ्या मुलीसाठी तो मार्ग निवडावा त्याबाबतचे करियर करावे असा दूरदृष्टी सल्ला मला २० वर्षांपूर्वी दिलेला होता. मी एकदा बारामतीला शरदराव पवार यांचे बंधू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्याकडे गेलो होते. तेथील शैक्षणिक संस्थांची माहिती भाऊंना सांगितली आणि दाखविली जात होती. आपल्या मुलाने किंवा मुलीने अशा मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घ्यावे अशी मनोमन इच्छा मनात धरली. त्याचा मुळपाया पक्का व्हावा म्हणून त्यांनी माझ्या मुलाला 'अनुभूती' शाळेममध्ये प्रवेश देऊन केवळ शिक्षण दिले नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाची 'नसल' (पिढी) बदलून टाकली. आज माझ्या घरात जे संस्कार आणि शिस्त आहे, ती भाऊंच्या विचारामुळेच आहे.

जेव्हा माझ्या आईचे निधन झाले, तेव्हा भाऊंनी सर्व यंत्रणा हलवून मला अवघ्या १५ तासांत उत्तर प्रदेशातील माझ्या गावी पोहोचवले. त्यांना माननीय अशोकभाऊंना सांगितलेले शब्द मला आजही आठवतात "माझा ड्रायव्हर, त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराला वेळेत पोहोचला पाहिजे," हे श्रद्धेय मोठ्याभाऊंचे शब्द माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते.

त्यांच्या शेवटच्या दिवसांत, जेव्हा त्यांनी अन्न त्यागले होते, तेव्हा माझ्या आग्रहाखातर त्यांनी पोह्यांचा एक घास घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "खान, तू सांगतोयस म्हणून खातोय, पण आता इच्छा उरली नाहीये." एका मालकाचे आपल्या ड्रायव्हरवर इतके प्रेम असू शकते, हे पाहून आजही माझे डोळे पाणावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT