

जळगाव : मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणात पोलीसांना पाच संशयितांना ताब्यात घेतले असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनींग परिसरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा ३ वर्षीय मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयावरून तिथे जमा झालेल्या जमावाने त्या तरुणाला पकडले आणि विचारपूस न करताच बेदम मारहाण सुरू केली.
अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली. पोलीस ठाणे अंमलदार सूर्यकांत नाईक यांनी तातडीने बीट अंमलदार श्रीकांत धनराज बदर आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोलीस जेव्हा लक्ष्मी जिनींगजवळ पोहोचले, तेव्हा तिथे मोठी गर्दी जमली होती आणि तो अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि डोक्याला, हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या.
उपचारादरम्यान मृत्यू आणि कायदेशीर कारवाई
पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने शासकीय वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे हा तरुण शुद्धीवर नव्हता. मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खु.), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, सध्या रा. सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. जळगाव) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .