

जळगाव : बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन हातसफाई करणाऱ्या एका महिला टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जामनेर तालुक्यातील तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीची ३२ हजार ४०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.
पाचोरा तालुक्यातील वडगाव खुर्द येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकरी श्रावण ताराचंद पाटील हे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:१५ ते ३:४५ च्या सुमारास पाचोरा बसस्थानकातून बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून १३ हजार ४०० रुपये लंपास केले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, २३ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (DB) कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. पाचोरा बसस्थानक परिसरात तीन संशयित महिला प्रवासी महिलांची टेहळणी करत असून त्या पिकपॉकेट (खिसेकापू) असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी या महिलांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) निर्मला सुनील जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, ता. जामनेर)
२) सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. कुंभारी, ता. जामनेर; मूळ रा. भोकरदन)
३) उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, ता. जामनेर)
पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून अनुक्रमे १३,५०० रुपये, ६,६०० रुपये आणि १२,३०० रुपये अशी एकूण ३२ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव विभाग) कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी, प्रियांका आहेर, योगेश पाटील, संदीप राजपूत, सोनाली पाटील, कल्पना निंबाळकर आणि संगीता पाटील यांचा समावेश होता. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी करत आहेत. बसस्थानकावर प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.