जळगाव पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरातील व तालुक्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन जणांना उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यातच आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पोलिस प्रशासनाने उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांतांकडे सादर केले आहेत. या अनुषंगाने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील मंगल देविदास कोळी भुसावळ शहरातील दीनदयाल नगरीत शेख नईम सलीम शेख याना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
या दोन्ही सराईत गुन्हेगारांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. यासंदर्भात डी. वाय. एस. पी सोमनाथ वाकचौरे यांनी भुसावळ उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपारीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावणी होऊन दोन्ही सराईतांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.