उत्तर महाराष्ट्र

दिल्ली पोलिसांकडून नाशिकच्या ओझर येथून दोन सराईत ताब्यात

गणेश सोनवणे

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
दिल्ली स्पेशल क्राइम ब्रॅन्च आणि ओझर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत फरिदाबाद येथील दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खून, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दिल्ली येथे दाखल असल्याचे माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील मुंबई-आग्रा महामार्गावर उषा हॉस्पिटलशेजारी हेवन हाइट्स नावाची इमारत असून, या इमारतीतील प्रकाश विजय मोरे यांचा दहा नंबरचा फ्लॅट वायुसेनेत कार्यरत असलेल्या मनोरंजन शाहू (रा. एअरफोर्स, ओझर) यांनी गेल्या महिन्यात भाडेतत्त्वावर घेतला होता. याच फ्लॅटमध्ये दिल्लीतील सराईत गुन्हेगार संशयित टेकचंद खेडी श्रीडालचंद (30) व दयाचंद एलियाज डिलर (30) हे भाडेकरी म्हणून रहात होते. या सराईतांवर दिल्ली व आसपासच्या पोलिस ठाण्यात खून, दरोडे, विदेशी शस्त्र वापरणे यासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्याबाबत दिल्ली पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी दिल्ली पोलिसांना ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे, गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिरराव, जितेंद्र बागूल, दीपक गुंजाळ यांच्या पथकाने मदत करत संशयित टेकचंद खेडी श्रीडालचंद आणि दयानंद एलियाज डिलर यांना ताब्यात घेतले आहे.

भाडेकर्‍यांचा
प्रश्न ऐरणीवर….
देशाच्या संरक्षणाच्या द़ृष्टिकोनातून ओझर हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून, येथे मिग विमानाच्या कारखान्यासह वायुदलाचे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. ओझरचा वाढता विस्तार लक्षात घेता, या ठिकाणी देशभरातून आलेले लोक वास्तव्य करतात. त्यामुळेच भाडेकरूंना घर, फ्लॅट देताना त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन होणे गरजचे आहे.

अनोळखी भाडेकरूंना आपला बंगला, फ्लॅट देताना जागामालकाने याची माहिती पोलिस ठाण्याला द्यावी. गुन्हेगार अथवा समाजविघातक प्रवृत्तींना आश्रय देऊ नये. भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी.
– अशोक रहाटे,
पोलिस निरीक्षक, ओझर

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT