उत्तर महाराष्ट्र

एलएलबी’चा निकाल रखडल्याने ‘एलएलएम’चा खोळंबा

गणेश सोनवणे

नाशिक : सतीश डोंगरे
कोरोना महामारीमुळे विधी शाखेच्या अभ्यासक्रमाचे बिघडलेले नियोजन ट्रॅकवर आणण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अजूनही यश आल्याचे दिसून येत नाही. विद्यापीठाच्या या गलथानपणाचा आता विद्यार्थ्यांना फटका बसत असून, पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात विधी शाखेच्या परीक्षा संपल्या. मात्र, निकालाचा थांगपत्ताच नसल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा खोळंबा झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 'एलएलएम'ला प्रवेश घेतला आहे, त्यांना 'एलएलबी' उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने, नियमित फी व्यतिरिक्त हजारो रुपये दंड भरावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'एलएलबी' अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीअंतर्गत घेण्यात आलेली क्लॅट (कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट) ही परीक्षा जून महिन्यात दिली. या परीक्षेचा निकाल जूनमध्येच घोषित करण्यात आला असून, जुलै महिन्यात त्याची प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली आहे. नाशिकमधील काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्यांनी कागदपत्रांअभावी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशही घेतला आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीअंतर्गत देशात केवळ 21 महाविद्यालये असून, राज्यात मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशा तीनच जिल्ह्यांमध्ये ही महाविद्यालये आहेत. त्यामुळे नाशिकमधील काही विद्यार्थ्यांनी नागपूर तर काहींनी मुंबई, औरंगाबाद येथील महाविद्यालयात आपला तात्पुरता प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांनी लाखो रुपये फीदेखील भरली आहे.

या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना उत्तीर्ण, स्थलांतर तसेच हस्तांतरण आदी प्रमाणपत्रे 1 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याची मुभा दिली आहे. विलंब झाल्यास हजारो रुपये दंडही आकारला जाणार असल्याचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना स्पष्ट केले आहे. अशात एलएलबीच्या अंतिम वर्षाच्या निकालाबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाकडून देखील याविषयी काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. अशात विद्यापीठाने तातडीने निकाल घोषित करण्याबाबत तत्परता दाखवावी, अशी मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून केली जात आहे. दरम्यान, निकालाविषयी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.

… तर 55 हजारांचा दंड
एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जूनमध्ये मी 'क्लॅट' ही परीक्षा दिली अन् उत्तीर्ण झालो. 2 जुलै रोजी मी नागपूर येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीअंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कागदपत्रांअभावी 2 लाख 18 हजार रुपये फी भरून तात्पुरता प्रवेश घेतला. यावेळी कागदपत्रे जमा करण्यासाठी दोन महिन्यांचा महाविद्यालयाकडे अवधी मागितला. त्याबाबतचे घोषणापत्रही लिहून दिले. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'एलएलबी'च्या परीक्षा विलंबाने घेतल्याने माझा प्रवेश आता धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे परीक्षेला विलंब केलाच, शिवाय निकालाचीही तीच बोंब असल्याने एकतर प्रवेश रद्द करावा लागेल किंवा दंड भरावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 31 तारखेच्या आत प्रवेश रद्द केल्यास एकूण फीमधील 35 हजार, तर 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास 55 हजार रुपये संबंधित महाविद्यालय जमा करून घेणार आहे.

विदेशातील प्रवेशही अडचणीत
काही विद्यार्थ्यांनी यूएसए व इतर देशांमध्ये विधीच्या उच्च शिक्षणासाठी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. त्यांना उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. मात्र निकालच खोळंबल्याने या विद्यार्थ्यांचे प्रवेशदेखील अडचणीत सापडले आहेत.

विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना निवेदन
किमान एलएलबी अंतिम वर्षाचा निकाल त्वरित घोषित करावा याकरिता शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना 22 ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. त्यावेळी पुढील तीन दिवसांत निकाल घोषित करणार असल्याचे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही निकाल घोषित केला गेला नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT