

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाची तयारी तसेच उन्हामुळे रविवारी (दि. 28) सिंहगडावरील पर्यटकांची संख्या रोडावली होती. असे असले तरी दिवसभरात वाहनाने गडावर जाणार्या पर्यटकांकडून जवळपास एक लाख रुपयांचा टोल वन खात्याने वसूल केला. रविवारी सकाळी थंडगार वारे वाहत होते. मात्र, अकरा वाजल्यानंतर उन्हाच्या झळा बसू लागल्या. दुपारी दोननंतर पर्यटकांची वर्दळ कमी झाली. गडावर गेलेले पर्यटकही मोठ्या संख्येने गडावरून खाली आले. त्यामुळे घाटरस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.
वन विभागाचे सुरक्षारक्षक तसेच हवेली पोलिस डोणजे गोळेवाडी व अवसरवाडी टोल नाक्यावर नेमण्यात आले होते. रविवारी सिंहगडावरील दाखल पर्यटकांविषयी माहिती देताना सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके म्हणाले की, दिवसभरात गडावर चारचाकी 379 व दुचाकी 1143 वाहने गेली. सकाळी अकरापर्यंत पर्यटकांची वर्दळ होती. त्यानंतर गर्दी कमी झाली, त्यामुळे गडावर जाणार्यांची गैरसोय झाली नाही.