धुळे : जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे नदीपात्रांमधे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला असल्याने धुळे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर नदीकाठच्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्याला कालपासून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूरस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेर प्रकल्पातून 45 हजार क्युसेक विसर्ग
अनेर नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे अनेर धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे. त्या अनुषंगाने अनेर नदीच्या दोन्ही तीरावरील लोकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अनेर मध्यम प्रकल्पातून सकाळी 5 वाजता 45000 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नदीला पूर आला असून अनेर नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, तसेच शाखा अधिकारी पाटशाखा हिसाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पांझरा नदीला पूर
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्पातून सद्यस्थितीत 4900 क्युसेक विसर्ग सुरू असून पुढील काही तासात विसर्ग वाढविण्यात येणार आहे. या विसर्गामुळे धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला असून कालिका माता मंदिरा जवळून जाणारा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे . त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. ही वाहतूक गणपती मंदिरावरील पुलावरून वळवण्यात आली आहे. दरम्यान या पुरामुळे आज पहाटेपासूनच धुळे महानगरपालिकेचे पथक नदीकाठावर गस्त घालत असून नागरिकांना नदीपात्रापासून लांब राहण्याचे आवाहन केले जाते आहे.
धुळे शहरातील शाळांना सुट्टी
दरम्यान मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे शिक्षण विभागाने देखील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याची सूचना दिली आहे. यासाठी धुळे शहरातील प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी ही सूचना केली आहे. धुळे जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य तसेच कोणत्याही प्रकारचा जिवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासन व संबंधित शाळा प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने आवश्यकतेनुसार आज दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी शाळेस सुट्टी जाहीर करण्याबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी सूचना करण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.