Murbad heavy rainfall : मुरबाड परिसर जलमय; रहिवाशांचे संसार पाण्‍यात

अनियोजित बांधकामे, भराव, महामार्गाच्या रचनेमुळे पूरस्थिती? कारवाईची मागणी
Murbad heavy rainfall
Murbad heavy rainfallpudhari photo
Published on
Updated on

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

मुसळधार पावसाने बुधवारी मुरबाड शहरातील इमारत परिसर पुन्हा एकदा जलमय झाला. यामुळे शहरातील नागरिकांचे संसार अक्षरश: पाण्‍यात गेल्याने संसाराची दैना झाल्याचे दिसून आले.

येथील विद्यानगर, गुरुकुल सोसायटी, प्रमुख दर्शन, मेट्रो स्वीट्स, व्हॅलेन्सिया सोसायटी तसेच म्हसा नाका परिसरातील अनेक इमारतींच्या तळमजल्यात चिखलमिश्रित पाणी शिरल्याने नागरिकांच्या संसाराची अक्षरशः दैना उडाली. घरातील अन्नधान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे, पुस्तके, कपडे आणि अन्य जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले असून रहिवाशांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Murbad heavy rainfall
Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाई तीव्र; अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात नागरिक रस्त्यावर

फोटोंमधून दिसणाऱ्या परिस्थितीनुसार अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून नागरिकांना घरातील सामान उंच ठिकाणी हलविण्याची धावपळ करावी लागली. अनेक कुटुंबांना स्वतःच्या घरातच पाण्यातून वावरावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांच्या मते, या भागातील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडविणारी अनियोजित बांधकामे, मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले भराव, नाल्यांचे अरुंद झालेले मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीदरम्यान पाण्याचा नैसर्गिक निचरा लक्षात न घेता करण्यात आलेली रचना यामुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे. शहरातील विकासकामांच्या नावाखाली झालेल्या नियोजनशून्य हस्तक्षेपाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

ही परिस्थिती यंदा नवीन नसून दरवर्षी पावसाळ्यात याच भागात पाणी साचून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. तरीही संबंधित यंत्रणांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्येक वर्षी पंचनामे, पाहण्या आणि आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात समस्या 'जैसे थे' असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नुकतेच या भागात कन्स्ट्रक्शनचे काम सुरू करण्यात आल्याने परिसर अधिकच जलमय बनल्याची तक्रार स्थानिक रहिवासी गणेश खंडागळे यांनी याबाबत कारवाईची मागणी केली आहे. तसेच या परिसरात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित बांधकामांची तातडीने चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांच्या परवानग्या रद्द कराव्यात, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडविणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करावी, तसेच पूरस्थितीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि दोषी घटकांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Murbad heavy rainfall
Pune Water Tanker Rates: पाणीकपातीचा फटका; पुण्यात खासगी टँकरचे दर दीडपट वाढले

यासोबतच या भागासाठी स्वतंत्र पर्जन्यजल निचरा आराखडा तयार करून नाले रुंदीकरण, अडथळे हटविणे आणि पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. दरवर्षी पावसासोबत येणाऱ्या या संकटातून इमारत परिसरातील रहिवाशांची कायमची सुटका कधी होणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून शहर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित यंत्रणा याबाबत नेमकी कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे संपूर्ण मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news