

Cobra Rescue Nagpur
नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साप बाहेर पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी पिपळा फाटा आणि विठोबा नगर परिसरात विषारी साप आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही सापांचे सुरक्षित रेस्क्यू केले.
पहिली घटना पिपळा फाटा येथील सह्याद्री कॉम्प्लेक्स परिसरात घडली. मिथुन लेंडे यांच्या घराच्या बाथरूमच्या दरवाजात विषारी नाग (कोब्रा) अडकलेला दिसताच कुटुंबीयांची एकच धांदल उडाली. तत्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने नागाला दरवाजातून बाहेर काढले. मात्र, दरवाजात अडकल्यामुळे नाग जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी सिव्हिल लाइन्स येथील सेमिनरी हिल्स वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
दुसरी घटना विठोबा नगर येथे घडली. मुसळधार पावसादरम्यान एक साप घरात शिरून पलंगाखाली लपला होता. घरमालक आशिष ठाकरे यांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली. सर्पमित्र शुभम पराळे यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यासाठी सोबत नेण्यात आले.
दरम्यान, सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात घरात किंवा परिसरात साप आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी त्वरित वन विभाग अथवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.