

Sakoli Rain Update
भंडारा: गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे साकोली तालुक्यातील तीन मंडळांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. साकोली तालुक्यातील आठ रस्ते पाण्याखाली आहेत. तसेच काही घरांचे नुकसान झाले. भंडारा तालुक्यातील गराडा येथे वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढल्याने गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी २९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून ३,३८८ क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. सध्या, कारधा येथील वैनगंगा नदीची पाण्याची पातळी २४४ मीटरवर पोहोचली आहे.
साकोली तालुक्यात मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. खांबा ते वांगी, विरसी ते उकारा, मालुटोला ते खांबा, सोमनाळा ते मिरेगाव, सोनपुरी ते बोद्रा, न्याहरवानी ते कटंगधरा आणि बोंडे ते गिरोला हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. सानगडीतील दोन, सालेबर्डीतील दोन आणि सेंदूरवाफामधील एका घराचे नुकसान झाले आहे.
भंडारा तालुक्यातील गराडा गावात वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला. शहापूरमधील चार आणि धारगावमधील तीन घरांचेही नुकसान झाले आहे. साकोलीप्रमाणेच लाखनी तालुक्यातील मुरमाडी मंडळातही मुसळधार पावसाची नोंद झाली असून, तेथे ७७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लाखांदूर तालुक्यात तई ते वाकल हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
साकोली तालुक्यातील शंकरपूर/वडेगाव येथे वादळी वाºयामुळे शेतशिवारातील सुमारे १० विजेचे खांब कोसळून असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत. शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व भात रोवणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.