धुळे : धुळ्यातील गुलमोहर कक्ष क्रमांक १०२ मधील १ कोटी ८४ लाख, ८४ हजाराचे घबाडाचे प्रकरण दाबून टाकण्याचा व भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न औरंगाबाद उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. उच्च न्यायालयाने दखल पात्र गुन्ह्याचा एफ.आय.आर. कायम ठेवून पुढील चौकशीचे आदेश दिले. तर एफ आय आर रद्द करण्याची तोंडी मागणी देखील उच्च न्यायालयाने नाकारल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.
राज्यभरात गाजलेल्या गुलमोहर रेस्ट हाऊस कक्ष क्रमांक १०२ मधील १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयाची हिशेबी रक्कम शिवसेना नेते अनिल गोटे, नरेंद्र परदेशी, अतुल सोनवणे, धीरज पाटील ,सलीम लंबू यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिनांक २१ मे २०२५ रोजी पकडून दिले होते. या संदर्भात उच्च न्यायालयात झालेल्या कामकाजाची तसेच या घटनेची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समितीची तीन दिवसाची बैठक, धुळे येथे आयोजित करण्यात आली होती. दिनांक १६ मे २०२५ पासून अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर काशिनाथ पाटील हे धुळ्यात मुक्कामाला येऊन थांबले होते. या पार्श्वभूमीवर मोठी रक्कम वेगवेगळ्या विभागाकडून गोळा केली गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गुलमोहर विश्रांती ग्रहातील संशयित खोलीवर कार्यकर्त्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. या नंतर थेट या खोलीला कुलुप ठोकण्यात आले. तसेच खोली बाहेर या आंदोलन सुरू करण्यात आले. या दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह २८ अधिकाऱ्यांना अनिल गोटे यांनी सातत्याने भ्रमणध्वनी करून सदर घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या विश्रांती ग्रहाच्या खोलीकडे तब्बल सहा तास कोणीही फिरकले नाही. शेवटी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुलमोहर विश्रांती ग्रहातील खोली क्रमांक 102 चे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी इन कॅमेरा पंचनामा करण्यात आला. यात कक्ष क्रमांक १०२ मध्ये एक कोटी ८४ लाख ८४ हजार एवढी मोठी रक्कम सापडली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दखलपात्र गुन्हा दाखल करावा म्हणून अनिल गोटे यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी धुळे यांचे न्यायालयात दाद मागितली असता संशयित आरोपी किशोर काशिनाथ पाटील याने जिल्हा व उच्च न्यायालय जाऊन तपासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अखेरीस औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी निकाल दिला असून, आपल्या निकालात त्यांनी असे म्हटले आहे की, आरोपीचे अपील अंशतः मंजूर करण्यात आले आहे. पण, त्यांच्याविरुद्ध या एफ.आय.आर. दाखल झाला असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना जर पुढील भविष्यात कायदेशीर आणि सनदशीर मार्ग अवलंबिता येईल. एफ. आय. आर. रद्द करण्याची तोंडी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. अशी माहिती गोटे यांनी दिली आहे.
न्यायालयाने निकाल पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, धुळे न्यायालयाने दिलेला निकाल योग्य होता. यावर प्रतिक्रिया देताना गोटे यांनी सांगितले की, अखेर सत्याचा विजय झाला. सरकारी यंत्रणेने कितीही प्रकरण दाबायचा प्रयत्न केले तरी, न्यायालयाने ते हाणून पाडलेले आहेत. अशी ही प्रतिक्रिया गोटे यांनी दिली आहे.