

धुळे : बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदुंवरील अत्याचारा विरोधात आज धुळ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हिंदू जनजागृती समिती आणि देवगिरी प्रांताच्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज धुळ्यात आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी बांगलादेशच्या सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करून जातीयवादी शक्तीचा निषेध देखील करण्यात आला.दरम्यान, भारत सरकारने तातडीने आंतरराष्ट्रीय दबाव आणून तेथील हिंदूंना सुरक्षित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शहरातील महाराणा प्रताप चौकात आज आक्रोश आंदोलन करण्यात आले. बांग्लादेश सरकारचा धिक्कार करणारे फलक हातात घेवून यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा, माजी महापौर जयश्री अहिरराव, हर्षवर्धन दहिते, हिलाल माळी, प्रा. अरविंद्र जाधव, उमेश चौधरी, महेंद्र शेणगे, संजय बोरसे, जयंत वानखेडकर, अमित वाघ, विनोद जगताप, नितीन शिंदे, शामकांत पाटील, प्रितेश अग्रवाल, निफाडकर गुरुजी, भाऊ महाराज रुद्र, निलेश दिक्षित, पवन सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, रोहित विभांडीक, ललिता नेवे, नाना महाराज आदींसह हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, बांग्लादेशातील शरीफ उस्मान हादी याच्यावर ढाका येथे गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदूंविरुध्द जाणीवपूर्वक हिंसाचार घडवून आणला जात आहे. हिंदू तरुण दीपू चंद्र दास याची जमावाने अमानुष पध्दतीने हत्या केली. तसेच झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले. बांग्लादेशातील हिंसक घटनांचे व्हीडीओ प्रसारमाध्यमातूनही समोर येत आहेत. बांग्लादेशात सत्ता बदलल्यानंतर जिहादींच्या कारवाया सतत वाढत आहेत.
हिंदू मंदिरे, व्यापारी केंद्रे, महिला, मालमत्ता, सरकारी कर्मचारी व पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. अल्पसंख्यांक हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना तेथील सरकार मौन बाळगून आहे. त्यामुळे बांग्लादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्यात यावेत, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, हिंदुंच्या सुरक्षिततेसाठी भारताने बांग्लादेशवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणावा, त्यानंतरही अत्याचार न थांबल्यास बांग्लादेशसोबतचे आर्थिक, व्यापारिक, राजनैतिक निर्बंध घालावा, तसेच भारत सरकारने बांग्लादेशला अद्दल घडवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.