धुळे

Dhule Pimpalner : पोेलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, वाहतूक नियमांचे धडे

गणेश सोनवणे

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा, प्रत्येक व्यक्ती हा पोलीस आहे. आपल्या आजूबाजूला काय घडते याची माहिती आपण घेतली पाहिजे. चुकीचे काही घडत असेल तर पोलीस खात्याला कळवले पाहिजे. ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी व्यक्तीशी संपर्क टाळत वाहन चालवताना काय काळजी घ्यावी आणि रस्त्यावर दर्शवले जाणारे चिन्ह काय दर्शवतात याची माहिती प्रमुख मार्गदर्शक बॉम्ब शोधक व नाशिक पथक मालेगांव ग्रामीणचे हवालदार भगीरथ सोनवणे यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करतांना सांगितले.

संबधित बातम्या :

येथील कै.नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम आणि वाहतूक प्रबंधन या विषया संदर्भात उद्बोधन करत मोबाईल, कॉम्प्युटर द्वारे ऑनलाइन व्यवहार, वेगवेगळ्या लिंक, अनोळखी व्यक्तींशी झालेला संपर्क या अशा विविध कारणांमुळे सायबर क्राईम आपल्या सोबत होऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी संपर्क करू नये, ऑनलाइन व्यवहार टाळावा, आपली गोपनीय माहिती कोणाला देऊ नये, गुन्हेगारी वाढेल असे मेसेज फॉरवर्ड करू नये, ऑनलाइन काम समजदारीने व हुशारीने करावे.

18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लायसन काढून वाहनांचा वापर करावा. रस्त्याकडे असलेले फलक, चिन्ह समजून घ्यावेत. ते वाहतूक नियमांचा आरसा असतात. चिन्ह तीन प्रकारची असतात हे त्यांनी समजून सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व निर्भय असावे. प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य सिद्ध केले पाहिजे. समाजात एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण पुढे आले पाहिजे असे भगीरथ सोनवणे यांनी सांगितले.

तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कमी वयात गाडी चालवू नये, अभ्यास जास्त करावा, आई वडिलांचे नाव उज्वल करावे. तर विद्यार्थिनींसाठी त्यांनी स्वतंत्र मार्गदर्शन करतांना सांगितले की मोबाईलचा वापर कमी करावा, अनोळखी व्यक्तींशी कुठलीही माहिती शेअर करू नये. तर जीवनात आई वडिल व शिक्षकांचे एकावे, त्यांचा आदर करावा, काही समस्या असल्यास आईशी बोलावे, महिला पोलीस यांच्याशी संपर्क साधावा असे एपीआय पारधी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर शाह, उपमुख्याध्यापक उमेश पाटील, पर्यवेक्षक ललित मुसळे, आर डी सोनजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विशाल गांगुर्डे यांनी केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT