Pit bull : जगातील सर्वात मोठा पिटबुल कुत्रा | पुढारी

Pit bull : जगातील सर्वात मोठा पिटबुल कुत्रा

लंडन : जगात श्वानांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. एखाद्या कपातही बसू शकणार्‍या चिमुकल्या चिहुआहुआ कुत्र्यापासून ते उंच, धिप्पाड अशा ग्रेट डॅनपर्यंतच्या अनेक प्रजातींचे श्वान पाळले जातात. त्यामध्येच पिटबूल श्वानाचाही समावेश आहे. अर्थात हे श्वान अतिशय आक्रमक असल्याने अनेक ठिकाणी ते पाळण्याची परवानगीही नसते. आता अशाच एका भल्या मोठ्या पिटबुल श्वानाची माहिती समोर आली आहे. हा जगातील सर्वात मोठा पिटबुल असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचे वजन तब्बल 80 किलो आहे!

पिटबुल कुत्र्यांकडून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भारतातही अनेक लहान मुलांना अशा कुत्र्यांनी जखमी केले आहे. त्यामुळे या कुत्र्यांवर बंदी आणण्याची मागणीही होत असते. असा आक्रमक कुत्रा अतिशय मोठ्या आकारात पाहायला मिळाल्यावर तर अनेकांच्या छातीत धडकी भरू शकते. सोशल मीडियात अशा पिटबुलचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्याचे नाव आहे ‘हल्क’. नावाप्रमाणेच हा धष्टपुष्ट कुत्रा आहे. तो आपल्या मागील पायांवर उभा राहिल्यास त्याची उंची सहा फूट होते. या कुत्र्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. ब्रिटनमध्ये हा कुत्रा आहे. अर्थात तिथेही पिटबुलवर बंदी असली तरी अवैध रितीने हे श्वान पाळले जातात.

Back to top button