प्लूटोच्या पलीकडे आढळला बारा खगोलांचा ‘दुसरा क्यूपर बेल्ट’! | पुढारी

प्लूटोच्या पलीकडे आढळला बारा खगोलांचा ‘दुसरा क्यूपर बेल्ट’!

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अफाट पसार्‍यात अनेक रहस्ये दडलेली आहेत. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ नावाचा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. तसाच पण त्यापेक्षाही मोठ्या आकाराचा पट्टा आपल्याच सौरमालिकेच्या टोकाला असून त्याला ‘क्यूपर बेल्ट’ असे म्हटले जाते. आता खगोलशास्त्रज्ञांनी प्लुटोच्या पलीकडे असाच आणखी एक पट्टा असल्याचे शोधून काढले आहे. त्यामध्ये डझनभर अवकाशीय शिळा असल्याचे दिसून आले आहे. मोठ्या आकाराच्या या बारा खगोलांमुळे हा भाग ‘दुसरा क्यूपर बेल्ट’ ठरू शकतो, असे संशोधकांना वाटते.

क्यूपर बेल्टच्या आणि प्लूटोच्या कक्षेपलीकडे संशोधकांनी मोठ्या आकाराच्या नव्या डझनभर अवकाशीय शिळा शोधल्या आहेत. त्यामुळे अंतराळाबाबतचे आपले ज्ञान अजूनही किती मर्यादित आहे याची प्रकर्षाने जाणीव संशोधकांनाही झालेली आहे. आपल्या आठ ग्रहांच्या ग्रहमालिकेला प्रकाशित करणार्‍या सूर्याचा प्रकाश या ग्रहांच्या व त्यांच्या चंद्रांच्याही पलीकडे जाऊन आणखी काही खगोलांना मिळतो हे स्पष्टच आहे. नेपच्यूनच्या पलीकडे आपली सौरमालिका 100 अ‍ॅस्ट्रोनॉमिकल यूनिटस्पर्यंत (एयू) खेचलेली आहे. नेपच्यून हा आपल्या ग्रहमालिकेतील सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर अवघे 30 एयू इतके आहे.

त्यावरून नेपच्यूनच्याही पलीकडे सौरमालिकेचा किती दीर्घ विस्तार आहे याची आपण कल्पना करू शकतो. आपल्या सौरमालिकेच्या टोकाला म्हणजेच ‘हेलिओपॉज’मध्ये विविध धूमकेतू आणि लघुग्रहांचे आश्रयस्थान असलेला ‘उर्ट क्लाऊड’ हा भाग आहे. तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाशी सैलसर बांधलेला आहे. हा भाग सूर्यापासून किमान एक हजार एयू इतक्या अंतरावर आहे. मात्र, नेपच्यूनच्या कक्षेपलीकडे असणारे बहुतांश धूमकेतू, लघुग्रह व अन्य खगोल हे ‘क्यूपर बेल्ट’मध्येच आहेत. हा भाग सूर्यापासून 30 ते 50 एयू इतक्या अंतरावर आहे. याच क्यूपर बेल्टमध्ये ‘प्लूटो’ या प्रसिद्ध अशा खुजा ग्रहाचा समावेश होतो.

एके काळी त्याला आपल्या ग्रहमालिकेत स्थान होते हे विशेष. आता त्याला पूर्ण ग्रह न मानता एक ‘ड्वॉर्फ प्लॅनेट’ समजून ग्रहमालिकेबाहेर ठेवलेले आहे. जर ग्रहमालिकेत ‘नववा ग्रह’ असेलच तर तो याच ‘क्यूपर बेल्ट’ मध्ये सापडेल असे म्हटले जाते. आता संशोधकांनी सूर्यापासून 60 एयू अंतरावर बारा मोठे खगोल शोधले आहेत. ‘नासा’च्या न्यू होरायझन्स या अंतराळयानाला नवे लक्ष्य मिळवून देत असताना त्यांचा शोध लागला. हे यान सध्या सूर्यापासून 57 एयू अंतरावर असून त्यानेच क्यूपर बेल्टमधील प्लुटो आणि अरोकोथ या खगोलांचे निरीक्षण केले आहे. हे यान हेलिओपॉजच्या दिशेने पुढे पुढे जात आहे. हवाईतील मौना किया ज्वालामुखीवरील सुबारू टेलिस्कोपने दिलेल्या डाटाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने वेगवान अभ्यास करून संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले.

Back to top button