धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ व अश्लिल वक्तव्ये करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका निवृत्त अधिकाऱ्याची पेन्शनही रोखण्याचे आदेश देण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उषा वर्मा यांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या चौकशी अहवालानंतर ही कडक कारवाई केली आहे.
धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा तिच्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सातत्याने छळ केला जात होता. ३० डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ दुय्यम निरीक्षक ए. व्ही. भडागे यांनी लैंगिक अत्याचार केल्याची अधिकृत तक्रार पीडितेने कार्यालयीन वरिष्ठांकडे दाखल केली होती. याशिवाय निरीक्षक आर. आर. धनवटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. बी. फुलपगारे आणि जवान गौरव सपके हेदेखील सातत्याने अश्लिल शेरेबाजी करून त्रास देत असल्याचा आरोप तिने केला होता.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत केली.आयुक्त उषा वर्मा यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत कार्यस्थळावरील महिला सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आला.
अहवालातील निष्कर्ष तसेच पुरावे विचारात घेवून आयुक्त उषा वर्मा यांनी चारही जणांना दोषी ठरवले. त्यानुसार वरिष्ठ दुय्यम निरीक्षक ए. व्ही. भडागे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. बी. फुलपगारे आणि जवान गौरव सपके यांना तातडीने निलंबित करण्यात आले. तर या प्रकरणातील आणखी एक दोषी निरीक्षक आर. आर. धनवटे हे सेवानिवृत्त झालेले असल्याने त्यांची पेन्शन रोखण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.