

जत : येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्याकडून 6 तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतल्याप्रकरणी जत पोलिसांनी पती, सासू, नणंद आणि नणंदेच्या पतीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गिरीजा राजेंद्र पाटील (वय 36, मूळ रा. संख, सध्या रा. अंबिकानगर, जत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, 15 मे 2025 पासून 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत पती राजेंद्र आप्पासाहेब पाटील, सासू सरुबाई (शांता) पाटील, नणंद सुजाता मल्लिकार्जुन बिराजदार, नणंदेचा पती मल्लिकार्जुन बिराजदार आणि नातेवाईक विजय हणमंतराय बिराजदार (सर्व रा. संख, ता. जत) यांनी वारंवार त्यांना त्रास दिला.
तक्रारीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळींनी तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. लग्नात आईकडून मिळालेले 6 तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. एप्रिल 2025 मध्ये गिरीजा यांनी पतीला सोबत नेण्यासाठी प्रयत्न केला असता, नातेवाईक विजय बिराजदार याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या ड्रायव्हरलाही मारहाण केली. यावेळी पती राजेंद्र पाटील याने ‘तू येथे राहिलीस तर तुला पेटवून देईन’, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.