Kusumba Ashram school infected with epidemic disease
वैद्यकीय पथक तातडीने आश्रम शाळेत दाखल. Pudhari File Photo
धुळे

धुळे : कुसुंबा आश्रम शाळेतील 53 मुलांना साथीच्या रोगाची लागण

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आश्रम शाळेमध्ये मुलांना साथीच्या रोगाची लागण झाली असून 50 पेक्षा जास्त मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम शाळेतच विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. व विद्यार्थ्यांवर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास

कुसुंबा येथे केशव स्मृती आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने कुसुंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णवाहिकेने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना अतिसार आणि उलटीचा त्रास सुरू होता. धुळे येथील जिल्हा रुग्णालयात 23 मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सात मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. तर कुसुंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 मुलांना दाखल करण्यात आले आहे.

वैद्यकीय पथक तातडीने आश्रम शाळेत दाखल

दरम्यान ही माहिती मिळाल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके तसेच साथरोग अधिकारी डॉक्टर भोसले यांच्यासह कुसुंबा येथील वैद्यकीय पथक तातडीने आश्रम शाळेत पोहोचले. या आश्रम शाळेत पहिली ते बारावीपर्यंत 729 विद्यार्थी आहेत. यापैकी 53 विद्यार्थ्यांना त्रास होत असला तरीही सामान्य लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील या वैद्यकीय पथकाने तपासणी सुरू केली आहे. तर आश्रम शाळेच्या दोन खोल्यांमध्ये विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय दोन वैद्यकीय पथकांना प्रत्येकी 12 तास अलर्ट राहण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बोडके यांनी दिले आहेत. दरम्यान या संदर्भात माहिती देताना डॉक्टर बोडके यांनी सांगितले की, या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना त्रास सुरू होताच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह धुळ्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आश्रम शाळेतच अत्यावश्यक कक्ष सुरू करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून आश्रम शाळेतील अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांच्या उलटी आणि रक्ताचे नमुने देखील धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. हा सर्व तपासणी अहवाल आल्यानंतर नेमका विद्यार्थ्यांना कशामुळे त्रास झाला, ही बाब उघडकीस येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT