धुळे : पुढारी वृत्तसेवा – आगामी सण उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या सात जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यापुढे सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.
आगामी निवडणुका व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हयातील सराईत गुन्हेगार यांचे अभिलेख तपासून त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. यासाठी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यामार्फत वेळोवेळी आढावा घेण्यात आला.
उपविभागीय दंडाधिकारी यांनी या प्रकरणी दाखल अभिलेख, सराईत गुन्हेगारांविरुध्द दाखल गुन्हे, साक्षीदार यांना सुनावणी दरम्यान तपासल्यानंतर गुन्हेगारी स्वरुपाच्या वर्तणुकीमुळे स्थानिक नागरीकांच्या मालमत्तेस व जीवीतास धोका निर्माण होत असल्याचे तसेच भागातील नागरीक हे नमुद सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द साक्ष किंवा तक्रार देण्यासाठी घाबरत असल्याचे निष्पन्न झाल्याने, संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी धुळे जिल्हयातुन हद्दपार केले आहे.
देवपुर भागातील आकाश उमेश पानचरे यास संपूर्ण धुळे जिल्ह्यातुन एक वर्ष, धुळे शहरातील राहुल ऊर्फ टाल्या गजानन थोरात यास संपूर्ण धुळे जिल्ह्यातून एक वर्ष, पापा गोल्डण ऊर्फ हाशिम हारुण पिंजारी, समीर गफ्फकार शेख यांना संपुर्ण धुळे जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे तर शिरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील आदिल अलादिन अत्ताप शेख, दिलीप सुदाम कोळी ऊर्फ बाप दिल्या, अमृत आनंदा पाटील, रा. उपरपिंड ता शिरपूर यांना देखील एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
नागरीकांनी भय मुक्त वातावरणात जीवन जगण्यासाठी, सण उत्सव साजरा करण्यासाठी व सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी धुळे जिल्हयातील सराईत गुन्हेगारांवर पोलीस व महसूल विभागाच लक्ष आहे. असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा: