उत्तर महाराष्ट्र

Dhule : चिकसे शिवारात मादी बिबट्याचा पिलांसह मुक्त संचार, पिंजरा लावण्याची मागणी

गणेश सोनवणे

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील चिकसे गावापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या नदी किनारी तीन दिवसांपासून मादी बिबट व तिच्या दोन पिलांचा मुक्त संचार येथील झुडपांमध्ये आहे. वन विभागाला ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अरुण माळके, वनरक्षक ज्योती पानपाटील, वनमजूर तुकाराम पाडवी यांच्यासह वन विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच पोलिस पाटील संदीप माळीच यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट दिली. यावेळी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल माळके यांना पिंजरा लावून मादी बिबट्यास पिलांसह इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.

तीन दिवसांपूर्वी देशशिरवाडे शिवारातील शेतातून वन्यपशुने दादाजी महाजन यांच्या पशुधनाचा फडशा पाडला होता. तसेच चिकसे येथील शेतकरी राजेंद्र पवार यांच्या गायीचे वासरुही पळविले.  येथील शेतमजुरांना भरदुपारी मादीबिबट्याचे पिलांसह दर्शन झाल्याने मजूर धास्तावले आहेत. शिवारात शेतीकामांना मजूर मिळणे कठीण झाले आहे.  नदीकाठी उंच वाढलेल्या झुडपांमध्ये मादीबिबट्याने आसरा घेतला आहे. तेथून जवळच ४-५ कुटुंब व बाहेरगावचे मजूर शेतात राहतात. म्हणून एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी वनविभागाने गांभीर्य लक्षात घेऊन पिंजरा लावून वन्यजीवांना सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी चिकसे व जिरापुर ग्रामस्थांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन 

वनक्षेत्रपाल माळके यांनी सध्या पिंजरा उपलब्ध नसल्याची माहिती दिली आहे. तसेच पिंजरा लावण्यासाठी नागपूर कार्यालयाकडून परवानगी काढावी लागेल असेही सांगितले. त्यामुळे शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी यापुढे शेकोटी पेटवणे, शेतात ठिकठिकाणी गोणपाटावर मिरची टाकणे, स्वतः बंद घरात झोपणे, रात्री पहाटे शेतात जाताना दोन ते तीन जणांनी सोबत जाणे अशी खबरदारी घ्यावी. असे आवाहन माळके यांनी केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT