Dhule Crime : पुण्याच्या व्यापाऱ्याकडून 40 लाख रुपये लुटणाऱ्या दोघा भामट्यांना बेड्या | पुढारी

Dhule Crime : पुण्याच्या व्यापाऱ्याकडून 40 लाख रुपये लुटणाऱ्या दोघा भामट्यांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पुण्याच्या व्यापाऱ्याला हत्याराचा धाक दाखवून 40 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोघा आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने आवळल्या आहे. या दोघाही आरोपींना निजामपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तांब्याची वायर ऑनलाइन विक्रीस असल्याची माहिती पाहून पुण्याच्या दसमेल सुखविंदर कालरा या व्यापार्‍याने साक्री तालुक्यातील संबंधित क्रमांकावर संपर्क केला. यानंतर सागर पाटील नावाच्या व्यक्तीने कालरा यांना साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीच्या जवळ तांब्याची तार घेण्यासाठी बोलावले. यानंतर निर्जन रस्त्यावर घेऊन गेल्यानंतर कालरा यांना मारहाण करून त्यांच्याकडील 40 लाखाची रोकड शस्त्राचा धाक दाखवून काढून घेण्यात आली.

या घटनेनंतर चोरट्यांनी पलायन केले. त्यामुळे कालरा यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार भादवि कलम 395 ,504 ,506 सह भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले. त्यानुसार पथक या आरोपींच्या मागावर होते. या दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी विठ्ठल शामराव साबळे, गंगाराम दगडू साबळे हे दोघे साक्री तालुक्यातील अंचाळे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच धनंजय मोरे, संजय पाटील, संदीप सरग, संतोष हिरे, पंकज खैरमोडे आदी पथकाने या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या दोघा आरोपींना निजामपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button