धुळे : पुढारी वृत्तसेवा : भरधाव जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. लहान भावाच्या उपचाराच्या खर्चासाठी चांदीचे दागिने गहाण ठेवण्यासाठी जात असताना या अपघातात मोठ्या भावाचा प्राण गेला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील बोराडी फाट्यावर ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील पानसेमल येथे राहणारे शांतीलाल पावरा यांच्या लहान भावावर शिरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या उपचारासाठी शांतीलाल पावरा शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे आपल्या नातेवाइकांकडे आले होते. भावाच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याने चांदीचे दागिने शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे गहाण ठेवण्यासाठी ते निघाले. शांतीलाल पावरा व संभू तेरसिंग पावरा हे दोघे बोराडीला जात असताना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी नजीकच्या बोराडी फाटा येथे भरधाव येणाऱ्या (एम पी 09 एच एच 80 47) ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शांतीलाल पावरा आणि संभू पावरा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळाल्याने सांगवी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या पथकाने ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेऊन शांतीलाल पावरा आणि संभु पावरा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान ट्रक चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?