उत्तर महाराष्ट्र

धुळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा, व्याख्यान

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

कला व विविध विद्यांना राजाश्रय देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार राजर्षी शाहू महाराज यांनी संपूर्ण राज्यात केला होता. सध्यस्थितीत देखील त्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा संघाचे कार्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान व मराठा सेवा संघ धुळे यांच्या वतीने अभिवादन सभा तसेच प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रतिभा चौधरी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार, माजी महापौर मोहन नवले, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, सुधाकर बेंद्रे, डॉ. संजय पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, मराठा महासंघाचे जगन ताकटे, स्वराज्य संघटनेचे निंबा मराठे, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, ॲड. एम. एस. पाटील आदि उपस्थित होते. यावेळी प्रा. सुर्यवंशी यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर अनेक पैलू उलगडून सांगितले. तसेच सामाजिक लोकशाही निर्माण करायची असेल तर त्यासाठी सामाजिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे विचार शाहू महाराज यांचे होते. शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, घटस्फोटाचा व वारसा हक्काचा कायदा, देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा, स्त्रियांच्या संरक्षणाचा कायदा असे कायदे केले. सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण, सार्वत्रिक पाटबंधारे धोरणाचा जाहीरनामा, शेतीतील विविध अभिनव प्रयोग, स्थानिक व्यापार व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन, मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी केली. इतिहासातले वाद मिटवल्याशिवाय भविष्यातले प्रश्न सुटत नसतात ही महाराजांच्या विचारांना धरून चाललेली परंपरा आहे. ती पुरोगामी महाराष्ट्राने अवलंबली पाहिजे. असेही त्यांनी सांगीतले. धुळे शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. पूर्णाकृती पुतळ्याचे संपूर्ण काम झाले असून चबुत-याचे भुमिपूजन पुढील महिन्यात 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT