सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी सरकारवर परिणाम नाही : शरद पवार

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी सरकारवर परिणाम नाही : शरद पवार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे, न्यायालयात काहीही निकाल लागला तरी त्याचा परिणाम सरकारवर होणार नाही. सध्या भाजप व शिंदे यांचे विधानसभेत बहुमत आहे असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. बारसू प्रकल्पाबाबत ते म्हणाले, मी स्वतः तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रश्न समजून घेतले. उद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांशी माझ्या एक, दोन बैठका झाल्या. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूकही होईल आणि प्रकल्पही होईल असा मार्ग निघतो का यावर चर्चा झाली. पण हा प्रकल्प करताना पर्यावरणाचे, शेतीचे, तेथील मत्स्यव्यवसायाचे काही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. त्या दृष्टीने पूर्ण तयारी करून स्थानिकांना विश्वासात घेवून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तेथे सक्तीने अथवा पोलिस बळाचा वापर करून प्रकल्प यशस्वी होवू शकणार नाही, आणि ते योग्यही ठरणार नाही, असे मत पवार यांनी मांडले.

राजीनाम्याच्या विषयावर ते म्हणाले, मी गेल्या ६० वर्षांपासून राजकारणात आहे. त्यात ५६ वर्षे मी विधीमंडळ अथवा संसदेत आहे. या देशात सलग ५६ वर्षे निवडून आलेले लोक मला माहित नाहीत. पण बारामतीसह राज्यातील, देशातील जनतेच्या आशीर्वादाने मला ५६ वर्षे कामाची संधी मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून मला वाटायला लागले की पक्षात नवीन नेतृत्व तयार व्हावे, नवी टीम तयार व्हावी. त्यासाठी मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. पण मी बाजूला होणार याचा अर्थ घरी बसणार असा नव्हता. राजीनाम्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया येतील असे वाटले नव्हते.

मला वाटले की एक, दोन दिवस गेले की आपण समजूत काढू. पण समजूत काढण्यासारखी अजिबात स्थिती नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यासह बाहेरील राज्यातून अगदी आसामपासून ते केरळपर्यंत अत्यंत महत्त्वाच्या लोकांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया येवू लागल्या. विनंती होवू लागली. देशात लोकसभेच्या निवडणूका एका वर्षात होण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत विरोधकांची एकजुट सुरु झाली आहे. त्यामुळे मी आत्ता बाजूला राहणे योग्य नाही, असे अनेकांचे मत आले. त्यांनी ते मला कळवले. आग्रह केला. शेवटी समाजकारणात, राजकारणात सहकाऱ्यांचा आग्रह नजरअंदाज करणे योग्य नसते. आपली काही मते असतात, पण सहकाऱ्यांच्या मताचाही आदर करावा लागतो. हे लक्षात घेवून निर्णयात मला बदल करावा लागला. पुन्हा जबाबदारी सांभाळावी लागली.

अजित पवार भाजप सोबत जाणार नाहीत
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेचा पवार यांनी इन्कार केला. ते म्हणाले, काही लोक असा प्रचार करतात. ती त्यांच्या कामाची पद्धत असते. अजित पवार यांचा ॲप्रोचहा सातत्याने काम करण्याचा आहे. ते फार 'मिडिया फ्रेंडली' नाहीत, हे तुम्हालाही माहिती आहे. काही लोक काम करणारे असतात तर काही लोक फक्त वृत्तपत्रात नाव येण्यासाठी काम करणारे असतात. अजित पवार यांना वृत्तपत्रात नाव कसे येईल याची कधीही चिंता नसते. त्यांना आपण हातात घेतलेले काम पूर्ण कसे होईल याची चिंता असते. तुम्ही जे म्हणता असे काही नाही. ते त्यांचे काम करत आहेत. आणि त्यांचे काम राष्ट्रवादीसाठी आणि राज्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news