धुळे, पुढारी वृत्तसेवा :
शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारात असणाऱ्या प्रियदर्शनी सूतगिरणीच्या गोदामास भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारात प्रियदर्शनी सूतगिरणीचे गोदाम आहे. या गोदामांमध्ये धूर येत असल्याची बाब सुरक्षारक्षकांना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी ही माहिती तातडीने संबंधितांना दिली. या आगीची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली. आणि मदत कार्य सुरू केले.
मात्र काही वेळातच गोदामामधून धुराबरोबर आगीचे लोट बाहेर येण्यास सुरुवात झाली. शिरपूर येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. तसेच, दोंडाईच्या आणि धुळे येथील अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. या नंतर या दोन्ही शहरांमधून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. मात्र रात्रभर ही आग धुमसत होती. या आगीमध्ये गोदामात ठेवण्यात आलेल्या सुमारे तेराशे कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. तसेच, आगीत सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा