धुळे : पुढारी वृत्तसेवा
शेतात मेंढ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील भामेर शिवारात घडली आहे. या संदर्भात दोन्ही घटकांकडून वेगवेगळ्या तक्रारी देण्यात आल्या असून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये मेंढ्या चारण्याच्या कारणामुळे शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात हाणामारीच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. दरम्यान याच कारणामुळे भामेर शिवारातील रमेश बेडसे यांच्या शेताजवळ मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यात वाद झाला. या वादाची परिणिती हाणामारीत झाली. या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाल्याने पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणात निर्मलाबाई बच्छाव यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या मालकीच्या शेतात 16 जणांनी मेंढ्या चारण्यासाठी सोडल्या. या मेंढ्या चारण्यासाठी रमेश बेडसे यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे नाना गोयकर, शिवदास गोयकर, अण्णा गोयकर, भुऱ्या गोयकर, संतोष गोयकर, पिंटू गोयकर, कैलास गोयकर, लहानू गोयकर, अर्जुन गोयकर, पंडित गोयकर, गोटू गोयकर, वामन गोयकर, सोनू गोयकर, मोतीराम गोयकर, राजू गोयकर, भिका गोयकर या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून नाना गोयकर यांनी तक्रार दिली आहे. यात सुजलोन कंपनीच्या पडीत जागेत नवागाव शिवारात मेंढ्या चारत असताना जमावाने बेदम मारहाण करून जीवे ठार करण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे नितीन पानपाटील, सचिन लसावळे, प्रवीण बेडसे, संदीप बेडसे, अण्णा पाटील, राजू बच्छाव, भैय्या बच्छाव, मोठा दौलत, शांतीलाल फुला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.