सांगलीत महिलेस मारहाण | पुढारी

सांगलीत महिलेस मारहाण

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील गारपीर चौकात घरात घुसून महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिला मारहाण करण्यात आली. रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी किशोर कांबळे (पूर्ण नाव, पत्ता निष्पन्न नाही) याच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कांबळेवर मारहाण, धमकावणे व विनयभंग, असे गुन्हे दाखल केले आहेत. पीडित महिला, तिची आई व दोन मुले घरी झोपले होते. त्यावेळी कांबळे त्यांच्या घरात घुसला. पीडित महिलेला त्याने ‘तू दुसर्‍याबरोबर का फिरतेस? त्याच्याबरोबर फिरलीस तर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी त्याने धमकी दिली.

महिलेने त्याला घरातून जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. कांबळे हातात वीट घेऊन महिलेच्या अंगावर मारण्यास धाऊन गेला. तिचा मुलगा यश याने कांबळेला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत कांबळेच्या हातून वीट महिलेच्या अंगावर पडली. त्यानंतर त्याने चाकू घेऊन तिच्या गळ्याला लावला व मारहाण केली. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. यावेळी परिसरातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. महिलेच्या आईने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कांबळेने त्यांना ढकलून देऊन पलायन केले. शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन महिलेन रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. संशयित कांबळे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button