उत्तर महाराष्ट्र

नाशिक : काँग्रेस शहराध्यक्ष आहेरांच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांच्या आशा पल्लवीत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्यात उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत 'एक व्यक्ती, एक पद' ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर यांनी शिर्डी येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या दोनदिवसीय चिंतन शिबिरात बुधवारी (दि. 1) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सोपविला. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शहर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेस पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी उदयपूरच्या चिंतन शिबिरात विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले होते. त्यापैकी प्रमुख असलेल्या 'एक व्यक्ती, एक पद' हा ठराव कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे. दोनपेक्षा अधिक पदे भूषविणार्‍या पदाधिकार्‍यांना राजीनामे देण्यासाठी 9 जूनची डेडलाइन देण्यात आली होती. त्यामुळे एकपेक्षा जास्त पदे असणारे पदाधिकारी कोणत्या पदांचा आणि कधी राजीनामा देणार? याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

नाशिक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची धुरा सात वर्षांपेक्षा जास्त काळ शरद आहेर यांच्या हाती होती. प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर करताना आहेर यांना बढती देत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग केले होते. मात्र, त्यानंतरही अनेक महिने शहराध्यक्षपदाचा तिढा न सुटल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

आता 'एक पद, एक व्यक्ती' या संकल्पनेनुसार आहेर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आहेर यांचा राजीनामा स्वीकारताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासह नाशिकचे संपर्कमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ना. अशोक चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, आहेर यांच्या राजीनाम्यामुळे इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहे.
आगामी काळात मनपा निवडणुका होणार असल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

शहराध्यक्षपदासाठी यांची नावे चर्चेत..
माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेवक राहुल दिवे, डॉ. हेमलता पाटील, प्रदेश प्रतिनिधी भारत टाकेकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शैलेश कुटे, ओबीसी प्रवर्गाचे विजय राऊत, राजेंद्र बागूल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT