रिक्षा कामगारांसाठी महामंडळ स्थापणार; परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांची घोषणा | पुढारी

रिक्षा कामगारांसाठी महामंडळ स्थापणार; परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांची घोषणा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘कोरोना कालावधीमध्ये रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याची शासनाला जाणीव असून, त्या काळात रिक्षाचालकांची नोंदणी करून काही प्रमाणात आम्ही मदतही केली आहे. आता रिक्षाचालकांची संख्या शासनाकडे उपलब्ध असून, रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल,’ अशी घोषणा परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी या वेळी केली.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड कार्यालयाच्या चाचणी मैदानावर उभारलेल्या 250 मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या हलक्या वाहनांसाठी‘रोलर ब्रेक टेस्टर’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी परब बोलत होते.

सांगलीत बनावट नोटांचा कारखाना

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी केले. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी, रिक्षाचालक, वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परब म्हणाले, ‘परिवहन विभागाकडून 80 सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. शहरात 3 लाख 50 हजार वाहनांना फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यक असते. त्यामध्ये 80 हजार रिक्षा आणि 1 लाख 20 हजार हलक्या वाहनांचा समावेश आहे.’

‘दिव्य प्रेरणा ज्योत’चे जल्लोषी स्वागत

परिवहन विभागाला जास्तीत जास्त निधी देणार

सर्व परिवहन कार्यालयांचा कारभार स्वच्छ, पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख झाला पाहिजे, अशी अपेक्षा करून उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, परिवहन विभागाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येत असून, पुढील काळातही यासाठी तसेच वाहने खरेदीसाठी आणखी निधी दिला जाईल. पुणे व पिंपरी शहरातील नवीन रिक्षा परवाने देण्यासंदर्भात आणि ते मर्यादित ठेवण्यासह जुन्या परवानाधारकांनाही पुरेसे उत्पन्न मिळेल याकडे लक्ष दिले जाईल, असे पवार यांनी सांगितले. तर शहरामध्ये रिक्षा परवान्यांची संख्या वाढली असून, ती मर्यादित ठेवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे परब म्हणाले.

पुण्याच्या वाहतूक नियोजनासाठी आराखडा

पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे विस्तारत असून, वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पुम्टा, पीएमआरडीएच्या माध्यमातून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

कराडमध्ये बड्या हस्ती पालिकेच्या थकबाकीदार यादीत

विधवा प्रथा निर्मूलनासाठी पालिकेचा पुढाकार

आष्टी, मोहोळमधील 9 गावांच्या पाण्याची सोय करा

Back to top button