

कराड : पुढारी वृत्तसेवा
महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातून शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी, यासाठी कराड नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग व सिटी एज्युकेशन सोसायटी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराड शहरातील महिला व मुलींसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या उपक्रमाची सुरुवात दि. 1 जून पासून सकाळी 7 वाजता नदी स्वच्छता अभियानातून केली आहे.
महिला सक्षमीकरण व बालकल्याण उपक्रम राबविण्यासाठी कराड नगरपरिषदेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांनी नगरपरिषदेमध्ये आपली नोंदणी केलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून डाटा एन्ट्री ऑपरेटर, कापडी पिशवी बनवणे, परकर मेकिंग, केक मेकिंग, मसाला मेकिंग, बिस्किट मेकिंग, बिर्याणी मेकिंग, पापड उद्योग, सेल्स ऐक्झिक्युटिव्ह, ड्रेस मेकिंग इत्यादी प्रशिक्षण घेण्यात येणार आहेत.
प्रत्येक प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 20 लाभार्थी असे एकूण 200 लाभार्थी यांची निवड संस्थेमार्फत केली जाणार आहे. उमेदवारांनी आपली नाव नोंदणी कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील कृष्णामाई महिला समुपदेशन केंद्रामध्ये करावी. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक तथा समुपदेशक अधिकारी सौ. दीपाली दिवटे, समुपदेशक अधिकारी प्रमोद जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा.
व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर दारिद्र रेषेखालील महिलांना दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागांतर्गत व्याज अनुदानासह वैयक्तिक व्यवसाय कर्ज रक्कम रुपये 2 लाखांपर्यंत तसेच सामूहिक व्यवसाय कर्ज रक्कम रुपये 10 लाखांपर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या मागणी निर्माण करण्यासाठी शहरी उपजीविका केंद्राची उभारणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे महिला सक्षम होण्यास मदत होणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सदर उपक्रमांचा लाभ घ्यावा तसेच अशासकीय संस्थांनी आपली नाव नोंदणी नगरपरिषदेकडे करून कराड शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.