लासलगाव : (जि. नाशिक) वार्ताहर
कांदा निर्यातीबाबत दीर्घ कालीन धोरण नसल्याने अनेक परकीय बाजारपेठा भारतावर गमावण्याची वेळ आली आहे. बांग्लादेश सरकारने गेल्या तीन महिन्यापासून कांदा आयात बंदी केल्याने भारताला याचा मोठा फटका बसलेला होता. मात्र आता बांग्लादेश ची सीमा कांद्यासाठी खुली होणार आहे.
बांगलादेश मधील श्यामबाजार ढाका, पभना, फरदापुर जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याने 40 ते 45 रुपये किलोची सरासरी ओलांडल्याने किरकोळ बाजारात कांदा भडकला आहे. तसेच बकरी ईद सणामुळे कांदा मागणी वाढेल याचा अंदाज आल्याने बांग्लादेश मधील राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे महासंचालक एएचएम सफीकझमान यांनी परिपत्रक काढून कांद्यावरील आयात बंदी हटवली आहे. बांगलादेशने कांद्याची आयात सुरू होण्याची नोटिफिकेशन काढल्याने आपल्या कडील कांदा दरात काहीशी वाढ होण्याची अपेक्षा नाशिक येथील कांदा निर्यातदार व्यापारी विकास सिंग यांनी बोलताना सांगितले.