शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट गोव्यात का येतोय? कारण आले समोर

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट गोव्यात का येतोय? कारण आले समोर
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील शिवसेनेचे ३९ फुटीर आमदार व त्यांचे सहकारी अपक्ष आमदार गोव्यात येत आहेत. त्याला मुख्य कारण म्हणजे गोव्यात शिवसेनेचे अस्तित्व जवळजवळ नाहीसेच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय जनता पक्षाची सत्ता गोव्यात आहे. उद्या महाराष्ट्र विधानसभेत ठाकरे सरकारची बहुमत चाचणी असून त्याआधी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीवरुन गोव्याला येणार आहे. त्यानंतर ते गोव्यातून मुंबईला जाणार आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता नको. त्याऐवजी भाजपासोबत सत्तेत राहुया या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच बंड केले आहे. त्यांच्यासोबत इतर अपक्ष आमदारदेखील आहेत. त्या सर्वांचा मुक्काम गेले अनेक दिवस गुवाहाटीत होता. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या दिनांक ३० रोजी सकाळी ११ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. गुवाहाटीवरुन थेट मुंबईला न जाता आधी गोव्यात शिंदे गट येणार आहे. त्यांचा आजचा रात्रीचा मुक्काम पणजीपासून जवळ असलेल्या दोनापावला येथील ताज कन्व्हेशन सेंटर या पंचतारांकित हॉटेलमध्ये असणार आहे. उद्या सकाळी एकनाथ शिंदे यांचा गट थेट मुंबईला रवाना होणार आहे.

गोव्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे हवी ती पोलिस सुरक्षा त्याचबरोबर इतर सोयीही एकनाथ शिंदे गटाला मिळणार आहेत. दुसरीकडे गोव्यामध्ये शिवसेनेचे अस्तित्व नसल्यासारखेच आहे. तसे पाहता गोव्यात भाजपच्या पूर्वी शिवसेनेच्या शाखा गोव्यामध्ये होत्या. मात्र, शिवसेनेतील कडवे शिवसैनिक हळूहळू इतर पक्षात दाखल झाले आणि सध्या जे राज्य प्रमुख आहेत. ते काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आहेत.

शिवसेनेचा एकही आमदार अद्याप गोवा विधानसभेत पोहचलेला नाही. चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ज्यावेळी भाजप मगो आणि शिवसेना युती केली होती. त्यावेळी साळगाव मतदारसंघातून त्यांचा एकमेव उमेदवार विजयाच्या समीप पोहोचला होता. मात्र, सध्याच्या काळामध्ये शिवसेनेचा राज्यांमधील तेरा पालिकात एकही नगरसेवक नाही. पणजी महापालिकेमध्ये ही एकही नगरसेवक नाही.

एकनाथ शिंदे यांचा गट गोव्यात आला तरी त्यांना गोव्यातील शिवसैनीकांच्या रोषाचा सामना करावा लागणार नाही. किंवा निदर्शने होण्याची शक्यता नाही. जवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शिवसैनिक गोव्यात येऊन एकनाथ शिंदे याचा निषेध करू शकतात. मात्र, सध्यापर्यंत अशा कुठल्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत. एकूणच एकनाथ शिंदे यांचा गट येथील ताज कन्व्हेशन सेंटर या हॉटेलमध्ये दाखल होत असल्यामुळे गोवा सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news