उत्तर महाराष्ट्र

अनिल परब : रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय ; प्रथमोपचार किटचे वाटप

गणेश सोनवणे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा ; अपघातात जखमी झालेल्या माणसाचा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने त्याक्षणी स्वत:चे कर्तत्व समजून प्रथमोपचार करणारे नागरिक हे खरे देवदूत असतात, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले. रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित प्रथमोपचार किटचे वाटप व प्रथमोपचार यासंबंधी प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 250 किलोमीटर अंतरातील अपघात स्थळांजवळ असणारे हॉटेल चालक, मालक व इतर व्यवसायिकांना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांमार्फत प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीला 'गोल्डन अवर'मध्ये योग्य ती वैद्यकीय मदत मिळून त्यांचा जीव वाचवणे शक्य होईल, असे मंत्री परब म्हणाले.

याप्रसंगी अपघात माहितीफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रसंगावधान राखून अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात राहुल महाजन, गायत्री चव्हाण, विजय बटवाल, डॉ. विकास गुलेचा, वैभव वाघ, श्याम बगदाणे आणि भूषण भामरे यांना ना. परब यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले. अपघात स्थळावरील ढाबे, पेट्रोलपंप आणि टायर दुकानांच्या मालकांना सुप्रीम कोविड सेंटरतर्फे मोफत प्रथमोपचार किट पुरविण्यात आले.

याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, मोटार वाहन निरीक्षक संदीप बोधले, पूनम पवार आदी अधिकारी उपस्थित होते. मोटार वाहन निरीक्षक संदीप बोधले यांनी सूत्रसंचालन केले, तर पूनम पवार यांनी आभार मानले.

हेही वाचा ;

SCROLL FOR NEXT