New SP Ahilyanagar Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Reform: जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; सामान्यांना न्याय न दिल्यास कारवाईचा पोलिस अधीक्षकांचा इशारा

अन्यायग्रस्तांना तत्काळ न्याय देणे हीच खरी पोलिसिंग; डायल 112, नाईट पेट्रोलिंग आणि क्रॉस रेड मोहिमेला गती

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: पोलिस ठाण्याच्या दारात न्याय मागण्यासाठी येणार्‍या प्रत्येक अन्यायग्रस्त नागरिकाला न्याय मिळवून देणे हीच खरी पोलिसिंग आहे. त्याच दृष्टीने जिल्हा पोलिस दलात फेरबदल करून घडी बसविण्याचे काम सुरू केले आहे. अधिकार्‍यांची क्षमता पाहून त्यांना प्रभारी म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यामुळे खाकीला डाग न लागता सामान्य माणसाला न्याय मिळवून द्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे.

पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या. त्या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, पोलिस ठाण्यात येणार्‍या नागरिकांच्या तक्रारींचा निपटरा होण्यास विलंब लागत होता. आधी त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. नागरिक तक्रार घेऊन आल्यास तत्काळ शहानिशा करून निपटारा केला पाहिजे. तरच सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. जिल्ह्यात कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कोणाच्याही दबावाला बळी पडू नका

जिल्ह्यात कुठलीही घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करा. कोणाच्याही दबावाला बळी पडून नका. आपल्यासाठी पोलिसिंग महत्त्वाची आहे. आपण सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहोत. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. कोणाचा फोन आला म्हणून भूमिका बदलू नका, अशाही सूचना पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिल्या आहेत, असे सुदर्शन यांनी स्पष्ट केले.

डायल 112 गुन्हेगारांचा कर्दनकाळ

जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सेक्टरनिहाय डायल 112 ला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणताही घटना घडल्यास डायल 112 वर कॉल आल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होत आहेत. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडण्यापासून थांबला जात आहे. पोलिस घटनास्थळी गेल्याने गुन्हेगार पळून जातात किंवा पोलिसांच्या तावडीत सापडतात. दुसरीकडे फोन केल्यानंतर पोलिस तत्काळ येतात. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होत आहे. आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल होऊन त्याचा निपटरा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

नाईट पेट्रोलिंगवर भर

जिल्ह्यात सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज नाईट पेट्रोलिंगवर भर दिला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिस रस्त्यावर दिसत आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी लूटमार करणारे आणि अवैध धंद्यावाल्यांना चाप बसला आहे. कारण पोलिस रस्त्यावर असल्याने गुन्हेगार व अवैध धंद्यावाले रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यात आपोआप यश मिळत असून, तीच खरी पोलिसिंग आहे, असेही ते म्हणाले.

हिस्ट्रीशिटरवर करडी नजर

जिल्ह्यात सराईत गुन्हेगार व टोळ्यांची मोठी संख्या आहे. त्यासाठी टू प्लस योजना कार्यान्वित करण्यात आली होती. ती योजना आजही सुरू आहे. हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचे चेकआऊट सुरू असून, त्यांना वारंवार प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जात आहेत. याही पुढे त्यांनी गुन्हेगारी सुरूच ठेवल्यास गंभीर कारवाई करण्यात येईल.

दामिनी पथक अ‍ॅक्टिव्ह

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, शाळेच्या परिसरात फिरणार्‍या रोडरोमिओंसह टपोरींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात दामिनी पथक अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले आहे. अहिल्यानगरसह प्रत्येक शहरात स्कूल कमिटीची बैठक घेण्यात येणार आहे. स्कूल व्हॅनमध्ये चालकांबरोबर मुलांची काळजी घेण्यासाठी एका महिलेची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना शाळेला दिल्या जाणार आहेत.

‘क्रॉस रेड’चा दणका

जिल्ह्यात गेल्या एक महिन्यांपासून अवैध धंद्यांवर क्रॉस रेड सुरू होत्या. हा प्रयोग पहिल्यांदाच जिल्ह्यात करण्यात आला. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांसह पोलिस अधिकार्‍यांचेही धाबे दणाणले होते. त्यात पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या तरीही जिल्ह्यात क्रॉस रेडचा दणका सुरूच राहणार आहे. तक्रारी आल्यानंतर दुसर्‍या पोलिस ठाण्याचे अधिकारी रेड करणार आहेत. तर, संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

...तरी ड्युटीला प्राधान्य

जिल्ह्याची लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात तुलनेत जिल्हा पोलिस दलाकडे मनुष्यबळ कमी आहे. कमी मनुष्यबळामध्ये काम करणे इतकी सोपी गोष्ट नाही; परंतु तरीही सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहावे लागणार आहे. जिल्ह्यात कुठेही सामान्य माणसावर अन्याय होणार नाही यासाठी पोलिस अधिकारी तत्पर आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT