

श्रीगोंदा: चारित्र्यावर संशय घेऊन तरुणाने 17 वर्षीय मैत्रिणीचा निर्घृण खून करून, वडिलांच्या मदतीने तो जंगलात नेऊन जाळल्याची घटना सोमवारी (दि. 15) वडाळीच्या जंगलात घडली. श्रीगोंदा पोलिसांनी शुभम सुखदेव ओव्हाळ, सुखदेव ओव्हाळ (दोघे रा. काळकाई चौक, श्रीगोंदा) या बापलेकाला अटक केली.
याबाबत तरुणीच्या आईने फिर्याद दिली. तरुणी व आरोपी शुभमची मैत्री होती. 15 जून रोजी त्यांचा वाद झाला. रागाच्या भरात शुभमने तिच्या डोक्यात लोखंडी रॉड व फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. त्यात ती जागीच ठार झाली. शुभमने मृतदेह गादीत गुंडाळून ठेवला आणि केडगाव (अहिल्यानगर) गाठले. घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.
दुसर्या दिवशी 16 जून रोजी सकाळी शुभम व त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ श्रीगोंदा येथे आले. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मृतदेह गादीत गुंडाळून दुचाकीवरून वडाळी रस्त्यावरील जंगलात नेला. तेथे लाकूडफाटा गोळा करून, मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळून टाकला. मृतदेह पूर्ण जळेपर्यंत दोघे बापलेक तेथेच थांबून राहिले आणि पहाटेच्या सुमारास घरी आले.
दरम्यान, आरोपी शुभमने मैत्रिणीचा खून केल्याची माहिती नगर येथील मित्राला दिली. मात्र मित्राचा विश्वास बसला नाही. दुसर्या दिवशी सायंकाळी त्या मित्राला व्हीडिओ कॉल करून खून केल्याचे दाखविल्यानंतर त्या मित्राने कोतवाली पोलिसांना माहिती दिली. तेथून श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला गेला आणि श्रीगोंदा पोलिसांनी शुभम व त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक सचिन लिमकर, प्रवीण पाटील, सचिन लोळगे, संदीप राऊत, संदीप शिरसाठ, राहुल मोढळे, नय्युम पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे तपास करत आहेत. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी संबंधित तरुणीला शुभमने मारहाण केल्याची तक्रार श्रीगोंदा पोलिस ठाण्यात केली होती, मात्र तत्कालीन अधिकार्यांनी दुर्लक्ष केले. तेव्हाच तक्रार दाखल करून घेतली असती तर मुलीचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने व्यक्त केली.