Sujay Vikhe Patil Pudhari
अहिल्यानगर

Sujay Vikhe Patil: जिल्हा बँकेची निवडणूक लादली तर पूर्ण ताकदीने लढू: सुजय विखे

बिनविरोधासाठी सर्वांना विनंती; ‘घाबरलो’ हा गैरसमज दूर करा, दुष्काळात चिखलफेक नको म्हणून समन्वयाचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा बँकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची नाही तर शेतकरीहिताची आहे. सहकार क्षेत्रातील माणसाकडेच जिल्हा बँकेची धुरा असली पाहिजे आणि सहकार क्षेत्रातील लोकच संचालक म्हणून आले पाहिजेत, अशी माझी ठाम भूमिका आहे. बिनविरोधसाठी सर्वांना विनंती करणार आहोत. यदाकदाचित काही लोकांनी निवडणूक लादलीच, तर आम्हाला निवडणूक नवीन नाही. आम्हीही पूर्ण ताकदीने तयार आहोत, असे थेट आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिले.

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न म्हणून संगमनेरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाल्यानंतर विविध घडामोडी आणि नाराजीनाट्य रंगले. बैठकीच्या निमंत्रणावरून रुसाफुगी झाली. प्रस्थापितांविरोधात विस्थापितांनी पॅनलची बांधणी सुरू केली. मात्र, या काळात डॉ. विखे परदेश दौऱ्यावर होते. ते परतल्यानंतर राहाता तालुक्यासह पारनेरमध्येही त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधून भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

संगमनेरची बैठक मी बोलावली नव्हती!

‘जिल्हा बँकेची बिनविरोधची बैठक संगमनेरात झाली, त्यासाठी निरोपही थोरात यांनीच दिले होते. त्यामुळे कोणाला बोलावलेस कोणाला नाही, याबाबत त्यांनाच प्रश्न विचारा. मी काही बैठक बोलावलेली नव्हती. मलाही बैठकीसाठी संगमनेरहून फोनच आला होता,’ अशा शब्दात डॉ. सुजय विखे यांनी नाराज गटाच्या प्रश्नांचा चेंडू थेट बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टात टोलावला.

प्रत्येकालाच संचालक व्हायचंय; कसं जमेल?

बँकेच्या निवडणुकीत 800 उमेदवारी अर्ज नेले अन्‌ 150 अर्ज आले.. आणि पदे जर 18-20 असतील, तर यात सर्वांचे समाधान करता येणार नाही. प्रत्येकाला संचालक व्हायचे आहे, मात्र संचालकांचे नेमके काम तरी माहीत पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही स्पर्धा बंद झाली पाहिजे, असे मत डॉ. विखे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘संगमनेर’ला गेलो

शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक बिनविरोध व्हावी, यासाठी मी पुढाकार घेतला. ज्या विचारांच्या विरोधात मी लढलो होतो, शेतकऱ्यांसाठी तिकडे गेलो. माझे व्यक्तिमत्व मागे ठेवून जर हा पायंडा मी पाडू शकतो, तर प्रत्येकाने बिनविरोध प्रक्रियेत समन्वय साधला पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुन्हा एकमेकांविरोधात लढवल्या जातील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

आम्ही घाबरलो, हा गैरसमज काढून टाका!

आम्ही घाबरलो, सत्ता जाईल म्हणून हतबल झालो; मतदारसंख्या नाही, म्हणून घाबरलो, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. दुष्काळी परिस्थतीत चिखलफेक होऊ नये म्हणून हा सांमजस्य करार आहे. निवडणूक लागल्यास पूर्ण ताकदीने लढवली जाईल, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

राम शिंदे यांच्याशिवाय निर्णय होणार नाही!

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये बँकेत कोण उमेदवार होतो, यापेक्षा सन्मानपूर्वक तोडगा निघाला पाहिजे, असे माझे मत आहे. सभापती राम शिंदे यांच्याशी थोरात आणि पालकमंत्री यांनीही चर्चा केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीकडून पालकमंत्री आणि सभापती शिंदे व मविआकडून थोरात असे तिघे एकत्र बसतील, त्यानंतरच निर्णय होईल. सभापती शिंदे यांचे मत घेतल्याशिवाय कोणीही प्रक्रिया पुढे घेऊन जाणार नाही. त्यांच्या पदाचा योग्य मान-सन्मान या चर्चेच्या अनुषंगाने ठेवला जाईल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT