नगर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन एकरकमी 3 हजार 550 रुपये दर जाहीर करावा अन्यथा धुराडे पेटवू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेने दिला. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने 17 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा मिळावा यासाठी जबाबदारीने दर जाहीर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कारखाना व्यवस्थापनाला केले आहे.(Latest Ahilyanagar News)
साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदर व अन्य प्रश्नांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.31) अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरातील साखर कारखाना प्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजय गोंदे याशिवाय स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब लवांडे, शिवसेना (शिंदे गट) नेते अभिजित पोटे, बाळासाहेब फटांगडे, रमेश कचरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संजय जाधव, कृष्णा सातपुते, संजय वाघ, महादेव आव्हाड, बाळासाहेब कदमतसेच विविध कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीस कारखान्यांचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक उपस्थित राहिले नसल्याने शेतकरी संघटना तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत, बहुतांश कारखान्यांच्या वजन काट्यात घोळ आहे. शेतकऱ्यांना भाव कमी देण्यासाठी जाणूनबुजून साखर उतारा कमी दाखविला जातो. जाहीर केलेला दर प्रत्यक्षात देण्यास टाळाटाळ करुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. बिले देखील वेळेवर अदा केली जात नाहीत. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अधिकारी कारखाना व्यवस्थापनाला पाठीशी घालत आहेत. असे विविध आरोप करीत शेतकरी संघटना तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनांच्या कारभाराचे वाभाडे काढले.
गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांत उसाला प्रतिटन चार हजारांपेक्षा अधिक दर देत आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांना हा दर देणे का परवडत नाही असा सवाल यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करीत गोंधळ घातला.
केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार उसाला 3 हजार 551 रुपये प्रतिटन दर जाहीर करावा, इथेनॉल निर्मिती प्रकल्प असलेल्या कारखान्यांनी अतिरिक्त 200 प्रतिटन रुपये ज्यादा द्यावेत, कारखान्यांनी खासगी वजन काट्यावरील वजन ग्राह्य धरावे, क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक करु नये, वाहतुकीच्या दरात दुजाभाव नसावा, कुकडी साखर कारखान्याकडे थकीत असणारे शेतकऱ्यांचे 711 रुपये प्रति टन पेमेंट मिळावे आदी विविध मागण्या कारखाना व्यवस्थापनाने मान्य कराव्यात अन्यथा अन्यथा 17 नोव्हेंबर रोजी हजारो ऊस उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या बैठकीत झालेल्या विविध मागण्या आणि कारखाना व्यवस्थापनाबाबतच्या अडचणी इतिवृत्तात नोंद करण्यात आल्या असून, सदर अहवाल राज्य शासनाला पाठविला जाणार असल्याचे आश्वासन नगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेंश हिंगे यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले आहे.
साखर कारखाने दर जाहीर केल्यावर कार्यालयाला कळवित नाहीत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी साखर उतारा निश्चितीसाठी पडताळणी करतात. पंधरा दिवसांत बिले अदा न केल्यास 15 टक्के व्याजासह शेतकऱ्यांना बिले अदा करणे कारखाना व्यवस्थापनाला बंधनकारक आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कारखान्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचे आश्वासन बैठकीत सहसंचालक संजय गोंदे यांनी दिले.