Strawberry Farming Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Strawberry Farming: पर्जन्यछायेच्या तालुक्यात स्ट्रॉबेरीची गोड क्रांती! बहिरवाडीच्या तरुणाचा यशस्वी प्रयोग

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता अहिल्यानगरच्या मातीत; रवींद्र आढाव यांच्या प्रयोगाने शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: नगर तालुका हा पर्जन्यछायेचा म्हणून ओळखला जातो. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने शेती संपूर्णतः निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत असून, येथील बळिराजा कायमच आर्थिक संकटात दिसून येतो. अशा परिस्थितीत बहिरवाडी येथे सुशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा आंबट गोडवा आता नगरी मातीतही मिळणार असून, तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु निसर्गातील लहरीपणाचा नेहमीच फटका येथील शेतीला बसत असतो. त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच संकटात सापडल्याचे पहावयास मिळते. कायम तोट्यात जाणाऱ्या शेती व्यवसायावर मात करण्यासाठी बहिरवाडी येथील तरुण शेतकरी रवींद्र आढाव यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. स्ट्रॉबेरीचे उत्पादनही सुरू झाले असून, बाजारात तीनशे ते चारशे रुपये किलो भाव मिळत आहे.

स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी महाबळेश्वरला राजधानी म्हणून संबोधले जाते. महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन होत असते. त्याचबरोबर नाशिक, मुंबई, पुणे या भागात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला भंडारदरा पट्ट्यात काही प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड होत असते. नगरसारख्या पर्जन्यछायेच्या भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग येथील बळिराजांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

उष्णता व सपाट प्रदेशात चांगली वाढ होणारे व गोड फळांचे दर्जेदार उत्पादन होण्यासाठी कॅमरोसा, विंटर डॉन, चार्ली, नंदी, रेनकोट (रुबी) या जातीच्या रोपांची लागवड करावी. या जातीच्या स्ट्रॉबेरीचा स्वाद गोड व सुगंध उत्तम असतो. स्ट्रॉबेरी लागवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
रवींद्र आढाव, शेतकरी, बहिरवाडी

बहिरवाडी येथील रवींद्र आढाव उच्चशिक्षित शेतकरी आहेत. ते नेहमीच आपल्या शेतीत नवनवीन व आधुनिक पद्धतीने शेती करतात. बी.एड. झालेल्या आढाव यांनी बहिरवाडीच्या डोंगराळ रानमाळावर स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी हलकी ते मध्यम चिकन माती असलेली, तसेच सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध जमिनीची आवश्यकता असते.

स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक फायदे असतात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, तसेच फायबर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्‌‍स मोठ्या प्रमाणात आढळतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्वचा सुंदर व निरोगी ठेवते. हृदयाचे आरोग्य सुधारते. ब्लड शुगर नियंत्रणासाठी मदत, वजन कमी करण्यास उपयुक्त, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर, पचनासाठी उपयुक्त, रक्तदाब कमी करण्यास मदत असे विविध फायदे स्ट्रॉबेरीमुळे होतात.
डॉ. योगेश कर्डिले, वै. अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर

ठिबक सिंचनद्वारे दहा गुंठे क्षेत्रावर ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. फळे येण्यास 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो. दहा गुंठे स्ट्रॉबेरीसाठी सुमारे 80 हजार रुपये खर्च आला आहे. सद्यःस्थितीत स्ट्रॉबेरी निघण्यास सुरुवात झाली असून, बाजारभावही चांगला मिळत असल्याची माहिती रवींद्र आढाव यांनी दिली.

स्ट्रॉबेरीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते. जमिनीत पाणी साचले तर मुळे कुजतात. पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे, तसेच ठिबक सिंचन स्ट्रॉबेरीसाठी फायदेशीर ठरते. बेड पद्धती वापरल्यास रोपांची वाढ आणि फुलोरा उत्कृष्ट येतो. मल्चिंग पेपरचाही चांगला पर्याय ठरतो. योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.
माधवी घोरपडे, मंडलाधिकारी, कृषी विभाग, अहिल्यानगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT